नवी दिल्ली : न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा ट्वेन्टी-20 सामना चांगलाच रंगतदार झाला. हा सामना न्यूझीलंडने अखेरच्या षटकामध्ये जिंकला. या अखेरच्या षटकांमध्येच श्रीलंकेचे दोन खेळाडू एकमेकांवर आदळले आणि त्यानंतर जे काही घडले त्यामुळे चाहत्यांचे श्वास रोखले गेले.
अखेरच्या पहिल्या दोन चेंडूंवर श्रीलंकेला यश मिळाले. आता तिसऱ्या चेंडूवर श्रीलंकेचा गोलंदाज हरसंगा हॅट्रिक साजरी करणार का, याची उत्सुकता साऱ्यांना होती. अखेरच्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर न्यूझीलंडच्या मिचेल सँटनरने जोरदार फटका लगावला. हा चेंडू हवेत गेला. आता सँटनर बाद होणार आणि हरसंगाला हॅट्रिक मिळणार, असे बऱ्याच जणांना वाटत होते. कारण शेहान जयसूर्या हा टिपण्यासाठी धवत आला होता.
शेहान आता झेल पकडणार, असे वाटत असतानाच कुशल मेंडिसही त्याच दिशेने धावत आला. त्यामुळे या दोघांमध्ये टक्कर झाली आणि चेंडू सीमारेषेबाहेर फेकला गेला. ही टक्कर झाल्यावर शेहानला जबरदस्त मार बसला. त्यामुळे लगेचच डॉक्टरांना बोलावण्यात आले. शेहानची दुखापत गंभीर असल्यामुळे त्याला मैदानाबाहेर घेऊन जावे लागले. यानंतरच्या चेंडूवर सँटनरने चौकार मारत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.