वन डे वर्ल्ड कप संपला आता सर्वांना वेध लागले आहेत, ते पुढल्या वर्षी होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेचे. अमेरिका आणि वेस्ट इंडिज यांना या स्पर्धेचे संयुक्त यजमानपद दिले गेले आहे. भारतीय संघ हा वर्ल्ड कप नक्की जिंकेल, अशी घोषणा आताच रवी शास्त्री करून मोकळे झाले आहेत. २० संघांचा सहभाग असलेला हा वर्ल्ड कप अनेक तगड्या संघांसाठी आव्हानात्मक ठरणार आहे. ४ ते ३० जून २०२४ या कालावधीत ५५ सामने खेळवले जाणार आहेत. या वर्ल्ड कप स्पर्धेसाठी आफ्रिका विभागातील पात्रता फेरी सुरू आहे आणि नामिबियाने आज सलग पाचवा विजय मिळवून वर्ल्ड कपचे तिकिट जिंकले आहे. २० पैकी एकोणीसावा संघ तो ठरला आहे आणि आता एका जागेसाठी तीन संघांमध्ये चुरस पाहयला मिळणार आहे.
नामिबियाने आज तंझानियाविरुद्धच्या सामन्यात ५८ धावांनी विजय मिळवला. हा त्यांचा ICC Men’s T20 World Cup Africa Qualifier Final 2023 स्पर्धेतील सलग पाचवा विजय ठरला आहे. जेजे स्मित ( ४०), मिचेल व्हॅन लिंगेन ( ३०), निकोलास डेव्हीन ( २५) व गेरहार्ड इरास्मस ( २१) यांच्या खेळाच्या जोरावर नामिबियाने ६ बाद १५७ धावा केल्या. प्रत्युत्तरात तंझानियाला ६ बाद ९९ धावाच करता आल्या. अमन राजीवन ( नाबाद ४१) याने संघासाठी सर्वाधिक धावा केल्या. आता एका जागेसाठी झिम्बाब्वे, यूगांडा आणि केनिया यांच्यात स्पर्धा आहे.
पात्र ठरलेले १९ संघ...
अमेरिका, वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत, नेदरलँड्स, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, अफगाणिस्तान, बांगलादेश, आयर्लंड, स्कॉटलंड, पापुआ न्यू गिनी, कॅनडा, नेपाळ, ओमान, नामिबिया
स्पर्धेचा फॉरमॅट...
२० संघांची प्रत्येकी ५ अशा चार गटांत विभागणी केली जाईल. चारही गटातील अव्वल दोन संघ सुपर ८ साठी पात्र ठरतील. त्यानंतर ४-४ अशा दोन गटांत त्यांची विभागणी होईल आणि दोन्ही गटांतील अव्वल दोन संघ उपांत्य फेरीत खेळतील. त्यानंतर उपांत्य फेरी व फायनल असा सामना होईल.
Web Title: Namibia is the first team to qualify for the T20 World Cup 2024 from the Africa T20 World Cup Qualifiers, securing five wins in five games, Nineteen teams are confirmed, with one spot remaining
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.