नवी दिल्ली : अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये होणाऱ्या टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघ सध्या न्यूयॉर्कमध्ये आहे. या स्पर्धेनंतर विद्यमान संघ मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडचा कार्यकाळ संपत आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आधीच भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी २७ मेपर्यंत अर्ज मागवले होते. त्यानुसार, या पदासाठी आतापर्यंत ३ हजारांहून अधिक अर्ज आले आहेत.
दरम्यान, बीसीसीआयने आपल्या वेबसाइटवर एक गुगल फॉर्म शेअर केला होता, ज्याद्वारे भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकासाठी अर्ज भरायचा होता. याचा फायदा घेत बनावट अर्जांचा महापूर आला. इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी बनावट अर्ज करणाऱ्यांनी सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंग धोनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या नावाचा वापर केला आहे.
अनेक सोशल मीडिया युजर्सनी आपले अर्ज पाठवतानाचे स्क्रीनशॉट शेअर करण्यास सुरुवात केली. आता रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, बीसीसीआयला अनेक बनावट अर्जदारांची चौकशी करावी लागत आहे, ज्यांनी या पदासाठी दिग्गजांची नावे वापरली आहेत. यामुळे बीसीसीआयची डोकेदुखी वाढली असून आता खोट्या नावांची छाटणी करावी लागणार आहे. तीन हजारांहून अधिक अर्ज आल्याचेही रिपोर्ट नमूद करण्यात आले आहे.
इंडियन एक्स्प्रेसने बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याच्या हवाल्याने म्हटले आहे की, "गेल्या वर्षीही बीसीसीआयला असाच प्रतिसाद मिळाला होता जिथे अनेक बनावट अर्ज आले होते. यावेळीही अशीच स्थिती आहे. बीसीसीआयला गुगल फॉर्मवर अर्ज मागवण्याचे कारण म्हणजे एका शीटमध्ये अर्जदारांची नावे तपासणे सोपे होते."
द्रविड पुन्हा मुख्य प्रशिक्षक होणार नाहीसध्याचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडने पुन्हा अर्ज न करण्याचा निर्णय घेतला आहे. कारण द्रविडला आता कुटुंबासोबत वेळ घालवायचा आहे. २०२४ च्या टी-२० विश्वचषकानंतर द्रविडचा कार्यकाळ संपणार आहे. मुख्य प्रशिक्षकपदासाठी वास्तविक अर्जदारांच्या नावांवर कोणतेही अधिकृत विधान नसले तरी, अनेक उच्च-प्रोफाइल माजी क्रिकेटपटूंना या मुख्य प्रशिक्षकपदासाठी जोडले गेले आहे.
गौमत गंभीर आघाडीवरगौतम गंभीर, व्हीव्हीएस लक्ष्मण, जस्टिन लँगर, रिकी पाँटिंग, स्टीफन फ्लेमिंग हे मुख्य प्रशिक्षकपदासाठी आघाडीवर असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, अलीकडेच बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी मुख्य प्रशिक्षकासाठी पॉटिंगशी बीसीसीआयने चर्चा केल्याचा दावा करणाऱ्या वृत्तांचे खंडन केले होते. दरम्यान, आयपीएल २०२४ च्या फायनलनंतर जय शाह आणि गौतम गंभीरमध्ये दीर्घ संवाद झाला. तेव्हापासून गौतम गंभीर भारतीय संघाचा पुढील मुख्य प्रशिक्षक असू शकतो, अशी चर्चा वर्तविली जात आहे. मात्र, गौतम गंभीरने या पदासाठी अर्ज केला आहे की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.