नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींचं देशातील अनेक घटना, गोष्टी व व्यक्तींवर लक्ष असतं. सोशल मीडियातून अनेकदा ते याबद्दल भाष्यही करत असतात. सेलिब्रिटी, क्रिकेटर्स, राजकीय नेते, उद्योजकांबाबतही ते जागरुक असतात. नुकतेच त्यांनी टीम इंडियाचा गोलंदाज मोहम्मद शमीच्या प्रकृतीबद्दल विचारपूस करुन काळजी घेणारे ट्विट केले. मोदींच्या या ट्विटने शमी चांगलाच भारावून केला असून त्याने मोदींचे आभार मानले आहेत. तसेच, आपण दाखवलेल्या प्रेम व आपुलकीने मी लवकरच बरं होऊन परतेल, असा विश्वासही त्याने बोलून दाखवला. सध्या मोदींचे हे ट्विट चर्चेत आहे.
भारताच्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील अफलातून कामगिरीचा नायक मोहम्मद शमी ( Mohammed Shami) आणखी काही काळ क्रिकेटपासून दूर राहणार आहे. कदाचित तो आयपीएल म्हणजेच इंडियन प्रीमिअर लीग २०२४ लाही मुकण्याची शक्यता आहे. संपूर्ण वर्ल्ड कप दुखापतग्रस्त असूनही शमी इंजेक्शन घेऊन खेळला होता आणि त्याने ७ सामन्यांत २४ विकेट्स घेत प्रतिस्पर्धींना धक्क्यांमागून धक्के दिले होते. तो स्पर्धेतील सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज होता, परंतु वर्ल्ड कपनंतर तो क्रिकेटपासून दूर आहे. सोमवारी त्याच्या टाचांवर लंडनमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. शमीने स्वत:चं सोशल मीडियातून ही माहिती दिली. त्यानंतर, चाहत्यांना त्याला लवकरे बरे होण्यासाठी प्रार्थना केली, तसेच शुभेच्छाही दिल्या. त्यातच, पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही शमीला व्यक्तीगत ट्विट करुन लवकर बरे होण्यासाठी काळजी दाखवली
शमीने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंवर लिहिले की, "माझ्या achilles tendon टाचवर नुकतेच यशस्वी ऑपरेशन झाले आहे! ते बरे होण्यासाठी थोडा वेळ लागेल, पण मी माझ्या पायावर उभा राहण्यासाठी उत्सुक आहे.", शमीच्या या पोस्टनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज ट्विट करुन शमीची विचारपूस केली. ''तुम्हाला लवकरात लवकर बरे व्हावे आणि चांगले आरोग्य मिळावे ही इच्छा, मला विश्वास आहे की तुम्ही या दुखापतीवर धैर्याने मात कराल, असे ट्विट मोदींनी केले होते. मोदींच्या या ट्विटला शमीने प्रेमळ रिप्लाय दिला आहे.
मोदींच्या ट्विटला शमीचा रिप्लाय
पंतप्रधान नरेंद्र मोदी सरांकडून मला लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा देणारी वैयक्तिक चिठ्ठी मिळणे हे आश्चर्यकारक आहे. त्यांचा हा आपलेपणा आणि विचारशीलता माझ्यासाठी खरोखर आज खूप महत्त्वाचा आहे. मोदी सर, आपल्या शुभेच्छा आणि पाठिंब्याबद्दल धन्यवाद, असे मोहम्मद शमीने म्हटलं आहे. तसेच, मी माझ्या लवकर बरे होऊन खेळात परतण्यासाठी कठोर परिश्रम करत राहिन. तुमच्या निरंतर शुभेच्छा, प्रेम आणि समर्थनासाठी सर्वांचे आभार, असेही शमीने म्हटले.