Naseem Shah, Asia Cup 2022 PAK vs AFG: अतिशय अटीतटीच्या लढतीत पाकिस्ताननेअफगाणिस्तानवर शेवटच्या षटकात विजय मिळवत स्पर्धेच्या फायनलमध्ये धडक मारली. पाकिस्तानी गोलंदाजांच्या भेदक माऱ्यापुढे अफगाणिस्तानने २० षटकांत १२९ धावा केल्या होत्या. १३० धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना १० षटकांपर्यंत पाकिस्तानचा डाव संथ होता. नंतर पाकिस्तानच्या शादाब खान-इफ्तिखारने फटकेबाजी करत सामना फिरवला. या दोघांनी वेगवान फलंदाजी केली. पण शेवटच्या टप्प्यात अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी अतिशय शिस्तबद्ध गोलंदाजी करत सामन्यात रंगत आणली. असे असले तरी अखेर शेवटच्या षटकांत पाकिस्तानला ११ धावांची आवश्यकता असताना, नसीम शाहने पहिल्या २ चेंडूत २ षटकार खेचत पाकिस्तानला विजय मिळवून दिला. पाकिस्तानने या विजयासह श्रीलंकेविरूद्ध ११ सप्टेंबरला होणाऱ्या अंतिम फेरीत प्रवेश केला. तर अफगाणिस्तानच्या पराभवासोबत त्यांचे आणि भारताचेही आव्हान संपुष्टात आले.
१३० धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम शून्यावर माघारी परतला. त्याला एकच चेंडू खेळता आला. त्यानंतर पाकिस्तानी फलंदाजांनी संथी आणि बचावात्मक पवित्रा आजमावला. फखर झमान सुरूवात मिळाली पण ५ धावांवर तो धावबाद झाला. त्यानंतर भारताविरूद्धच्या सामन्यातील हिरो मोहम्मद रिजवानला राशिद खानने २० धावांवर पायचीत बाद केले. त्यामुळे १० षटकांपर्यंत पाकिस्तानची धावसंख्या ३ बाद ५२ इतकी होती.
त्यानंतर इफ्तिखार अहमद आणि शादाब खान जोडीने हवाई फटकेबाजीला सुरूवात केली. धावगतीचे गणित लक्षात घेता, इफ्तिखारने दोन दमदार चौकार खेचले, पण षटकार मारण्याच्या नादात त्याला फरीद अहमदने ३० धावांवर तंबूत पाठवले. शादाब खानने ३ उत्तुंग षटकार आणि १ चौकार खेचत २६ चेंडूत ३६ धावा केल्या, पण राशिद खानने त्याला माघारी धाडले. त्यानंतर मोहम्मद नवाज ४ धावांवर माघारी परतला. पाठोपाठ खुशदिल, हॅरिस रौफ आणि आसिफ अलीदेखील झटपट बाद झाले. पण नसीम शाहने शेवटच्या षटकात २ चेंडूत २ षटकार खेचत पाकिस्तानचा विजय साकारला.
प्रथम फलंदाजी मिळालेल्या अफगाणिस्तानच्या सलामीवीरांनी चांगली सुरूवात केली होती. हजरतुल्ला झझाई आणि गुरबाज दोघेही मोठी खेळी करू शकले नाहीत. गुरबाज १७ धावांवर तर हजरतुल्ला २१ धावांवर माघारी परतला. करीम जनातही १५ धावा काढून बाद झाला. पाठोपाठ नजीबुल्लाहने १० धावा काढून हजेरी लावली आणि परत गेला. कर्णधार मोहम्मद नबीला पहिल्याच चेंडूवर माघारी परतावे लागले. मात्र इब्राहिम झाद्रान फटकेबाजी करत होता. त्याने २ चौकार आणि १ षटकार खेचत सर्वाधिक ३५ धावांची खेळी केली. त्याच्या खेळीच्या जोरावर अफगाणिस्तानला १२९ धावांपर्यंत मजल मारता आली. राशिद खाननेही १८ धावा करत मोलाची भर घातली. पण पाकिस्तानने शिस्तबद्ध गोलंदाजी करत त्यांना मोठी धावसंख्या उभारण्यापासून रोखलं. पाकिस्तानकडून हॅरिस रौफने २ तर नसीम शाह, मोहम्मद हसनैन, नवाज आणि शादाब खानने १-१ बळी टिपला.