Asia Cup 2023 : भारतीय संघाकडून दारूण पराभव पत्करल्यानंतर पाकिस्तानच्या संघाला धक्के बसत आहेत. आशिया चषक स्पर्धेच्या फायनलमधील त्यांचे स्थान धोक्यात असताना प्रमुख गोलंदाज नसीम शाह ( Naseem Shah) याला माघार घ्यावी लागली आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ( PCB) ही माहिती दिली आहे आणि त्याच्याजागी झमान खान ( Zaman Khan) याचा समावेश करण्यात आला आहे.
भारताविरुद्धच्या सामन्यात नसीमच्या उजव्या खांद्याला दुखापत झाली होती. त्याने ४९व्या षटकात मैदान सोडले होते आणि फलंदाजीलाही तो आला नव्हता. आगामी वन डे वर्ल्ड कप स्पर्धा डोळ्यासमोर ठेवून खबरदारीचा उपाय म्हणून नसीला विश्रांतीचा सल्ला वैद्यकिय टीमने दिला आहे. झमन खान हा जलदगती गोलंदाज आहे आणि त्याने ट्वेंटी-२० सामन्यात पाकिस्तानचे प्रतिनिधित्व केले आहे. श्रीलंकेत आलेल्या संघासोबत तो होताच. त्याने ६ ट्वेंटी-२० सामन्यांत ४ विकेट्स घेतल्या आहेत.
जलदगती हॅरीस रौफ यालाही भारताविरुद्धच्या सामन्यात दुखापत झालेली आणि त्याने राखीव दिवशी षटकही नाही टाकले अन् फलंदाजीलाही नाही आला. त्याची दुखापत गंभीर नसली तरी त्यालाही वर्ल्ड कप स्पर्धा डोळ्यासमोर ठेवून विश्रांती दिली जाऊ शकते.
पाकिस्तानला उद्या शेवटची संधीश्रीलंकेची सलग १३ सामन्यांची अपराजित मालिका आज भारतामुळे खंडित झाली अन् पाकिस्तानला उभारी मिळाली. श्रीलंकेने ही मॅच जिंकली असती, तर पाकिस्तान स्पर्धेबाहेर जाण्याची शक्यता बळावली असती, परंतु आता त्यांना एक संधी मिळाली आहे. १४ तारखेचा त्यांचा सामना श्रीलंकेविरुद्ध होणार आहे आणि तो जिंकून ते १७ तारखेला भारताला फायलनमध्ये भिडू शकतात. पण, या सामन्यात पावसाने खोडा घातला अन् सामना रद्द झाला, तर श्रीलंका फायनल खेळेल. कारण त्यांचा नेट रन रेट ( ०.२०) अजूनही पाकिस्तानपेक्षा ( -१.८९) चांगला आहे.