लंडन : आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे व्यस्त वेळापत्रक (एफटीपी) ही खेळाडूंची थट्टा असून खेळाडूंना थकविणारा हा कार्यक्रम असल्याची टीका इंग्लंडचा माजी कर्णधार नासिर हुसेन याने केली. अष्टपैलू बेन स्टोक्स हा वयाच्या ३१ व्या वर्षी वन डेतून निवृत्त झाला. त्याने तिन्ही प्रकारात खेळणे शक्य नसल्याचे कारण दिले. हाच धागा पकडून नासिरने आपल्या स्तंभात लिहिले, ‘हे निराशादायी आहे. व्यस्त क्रिकेटचा हा परिणाम म्हणावा लागेल. आयसीसी व्यस्त वेळापत्रक बनवणार असेल आणि उर्वरित वेळेत काही देश स्वत:च्या लीग आयोजित करीत असतील तर खेळाडू दीर्घकाळ खेळू शकणार नाहीत. माझ्या मते ही थट्टा आहे. २०१९ ला विश्वचषक जिंकून देणारा खेळाडू त्यानंतर केवळ नऊ वन डे खेळून निवृत्त होतो, हे मनाला पटत नाही. स्टोक्स हा जखमा, मानसिक आरोग्य आणि अतिरिक्त कार्यभार यामुळे दीर्घकाळ संघाबाहेर राहिला.’
दुसरा माजी कर्णधार मायकेल वॉन म्हणाला, ‘खेळाडूंचे ओझे कमी करण्यासाठी द्विपक्षीय मालिका कमी व्हायला हव्यात. अनेक देश स्वत:च्या लीग घेत असतील तर द्विपक्षीय वन डे आणि टी-२० मालिका संपवून टाकायला हरकत नाही.’