ब्रिस्बेन : ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी नेट गोलंदाज म्हणून निवड झालेला वेगवान गोलंदाज थंगारासू नटराजन याने शुक्रवारी आगळावेगळा विक्रम केला. चौथ्या कसोटीसाठी त्याचा संघात समावेश होताच, एका दौऱ्यात सर्व तिन्ही प्रकारांत पदार्पण करणारा तो पहिला भारतीय खेळाडू बनला. तामिळनाडूच्या या २९ वर्षांच्या क्रिकेटपटूला प्रमुख खेळाडू जखमी असल्याने कसोटी खेळण्याची संधी मिळाली.
२ डिसेंबर रोजी कॅनबेरा येथे दुसऱ्या वन डेत तो खेळला होता. याशिवाय तीन टी-२० सामन्यांत त्याने सहा गडी बाद केले होते. आयसीसीने ट्विट करीत नटराजनचे अभिनंदन केले आहे. जसप्रीत बुमराहच्या दुखापतीमुळे नटराजनला संधी देण्यात आली. त्याला गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण यांच्या हातून कसोटी कॅप मिळाली. नटराजन हा भारताकडून कसोटी पदार्पण करणारा ३०० वा, तर सुंदर ३०१वा खेळाडू ठरला.