संकटात असलेल्या टीम इंडियाचे नेतृत्व सक्षमपणे सांभाळून अजिंक्य रहाणेनं ( Ajinkya Rahane) सर्वांची मनं जिंकली. मेलबर्न कसोटीत खणखणीत शतक झळकावून त्यानं अन्य सहकाऱ्यांसमोर प्रेरणादायी उदाहरण ठेवले. त्यानंतर युवा गोलंदाजांच्या पाठिशी खंबीरपणे उभं राहून त्यांच्याकडून चांगली कामगिरी करून घेतली. मोहम्मद सिराजवर ( Mohammed Siraj) वर्णद्वेषी शेरेबाजी होत असताना हुल्लडबाज प्रेक्षकांना हिस्कावून लावेपर्यंत अजिंक्यनं सामना थांबवला होता. त्या घटनेदरम्यान सिराजच्या खांद्यावर हात ठेऊन त्याला धीर देणारा अजिंक्य सर्वांच्या लक्षात राहील. रवींद्र जडेजामुळे धावबाद झाल्यानंतरही रागावण्याऐवजी अजिंक्य त्याच्याजवळ गेला आणि त्याला हताश होऊ नको, असा सल्ला दिला. केवळ भारतीयच नव्हे, तर अजिंक्यच्या खिलाडूवृत्तीचं ऑस्ट्रेलियाचा स्टार फिरकीपटू नॅथन लियॉन ( Nathan Lyon) यानंही कौतुक केलंय...
ब्रिस्बेन कसोटीतील ऐतिहासिक विजयानंतर चषक स्वीकारण्यापूर्वी अजिंक्यनं ऑसी फिरकीपटूला टीम इंडियाच्या खेळाडूंनी स्वाक्षरी केलेली जर्सी भेट म्हणून दिली. लियॉनचा तो १०० वा कसोटी सामना होता आणि टीम इंडियाकडून अजिंक्यनं त्याला ही खास भेट दिली. लियॉननं त्या जर्सीचा फोटो पोस्ट करताना टीम इंडियाचे व अजिंक्यचे विशेष कौतुक केलं. टीम इंडियाकडून अशी भेट मिळेल, याचा विचारही लियॉननं केला नव्हता.
''अजिंक्य रहाणे आणि टीम इंडियाला मालिका विजयाबद्दल मनःपूर्वक आभार. अजिंक्य दाखवलेल्या खिलाडूवृत्तीचेही आभार आणि टीम इंडियाच्या खेळाडूंची स्वाक्षरी असलेली जर्सी देऊन तुम्ही दाखवलेल्या प्रेमाचेही आभार,''असे लियॉननं लिहिले.