Join us  

पंत षटकार मारेल, पण... 'लायन'नं शेअर केला टीम इंडियातील 'वाघा'ला रोखण्याचा प्लान

कांगारूंच्या ताफ्यातील सर्वांचा सगळा फोकस हा फक्त अन् फक्त भारतीय संघातील एका गड्यावर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2024 5:10 PM

Open in App

Nathan Lyon on Rishabh Pant : भारतीय संघ सध्या घरच्या मैदानातील बांगलादेश विरुद्धच्या कसोटी सामन्यात व्यग्र आहे. ही मालिका संपली की पुन्हा टीम इंडिया भारत दौऱ्यावर येणाऱ्या न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिका खेळण्यासाठी मैदानात उतरेल. पण या दोन मालिकांपेक्षा भारतीय संघाच्या आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्याची चर्चा सर्वाधिक रंगताना दिसते त्यातही कांगारूंच्या ताफ्यातील सर्वांचा सगळा फोकस हा फक्त अन् फक्त भारतीय संघातील एका गड्यावर खिळल्याचे पाहायला मिळत आहे. तो खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून तो आहे पंत. 

रिषभ पंतची धास्ती; ऑस्ट्रेलियन फिरकीपटूनं शेअर केला त्याचा खास प्लान  ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्स याच्या रिषभ पंतला शांत ठेवण्यावर भर द्यावा लागेल या वक्तव्यानंतर आता नॅथन लायन याने रिषभ पंतला आउट करण्यासाठी खास प्लान आखल्याची गोष्ट बोलून दाखवली आहे.  स्टार स्पोर्ट्सला दिलेल्या खास मुलाखतीमध्ये ऑस्ट्रेलियन फिरकीपटूनं पंतसंदर्भात भाष्य केले.  

पंतसमोर ही एक चूक पडू शकते महागात

नॅथन लायन म्हणाला की, मला माहिती आहे की, तो माझ्या गोलंदाजीवर षटकार मारण्यासाठी आतूर असेल. पंतच्या भात्यात सर्व प्रकारचे फटके आहेत. अशा फलंदाजासमोर गोलंदाजी करणं आव्हानात्मक असते. कारण हा फलंदाज उत्तम चेंडूवरही फटकेबाजी करायला मागे पडत नाही. पंतसारख्या फलंदाजासमोर कोणत्याही गोलंदाजासमोर फार कमी पर्याय शिल्लक असतात. अचूक टप्प्यावर गोलंदाजी हाच त्याला रोखण्याचा उत्तम मार्ग आहे. इथं चूक झाली तर त्याची मोठी किंमत मोजावी लागते.   

पंतला रोखण्याचा हा एक सर्वोत्तम मार्ग, पण

 षटकार मारणाऱ्या बॅटरला  मी घाबरत नाही. पण पंतला यापासून रोखण्यासाठी प्रयत्नशील असेल. पंतसमोर गोलंदाजी करताना त्याला क्रिजमध्ये ठेवण्याचे मोठे आव्हान माझ्यासमोर असेल. त्याला मोठी फटकेबाजी करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करेन. यासाठी सर्वोत्तम गोलंदाजी करावी लागेल, असे म्हणत पंतला बाद करण्यासाठी त्याला डिफेन्स मोडमध्ये ठेवण्याचा प्लान असल्याचे ऑस्ट्रेलियन फिरकीपटूनं म्हटले आहे.

 कांगारुंच्या ताफ्यातील पंतच्या धास्तीमागचं कारण...

बॉर्डर गावसकर ट्रॉफी स्पर्धेत पंत आणि लायन यांच्यात तगडी फाइट पाहायला मिळेल. कसोटी क्रिकेटमध्ये आतापर्यंत ७ वेळा दोघे समोरासमोर आले आहेत. यात लायनने पाच वेळ भारतीय संघातील पंत नावाच्या वाघाची शिकार केली आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध पंतची कामगिरी सर्वोत्तम राहिली आहे. १२ डावात त्याने ६२.४० च्या सरासरीने ६२४ धावा केल्या आहेत. १५९ ही त्याची ऑस्ट्रेलिया विरुद्धची सर्वोच्च खेळी आहे. २०२१ च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात पंतनं गाबा टेस्टमध्ये ८९ धावांची नाबाद खेळी करत टीम इंडियाला ऐतिहासिक मालिका विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला होता. याच गोष्टीमुळे कांगारुंचे सर्व लक्ष्य हे पंतवर असल्याचे दिसते.

 

 

टॅग्स :रिषभ पंतभारतीय क्रिकेट संघआॅस्ट्रेलियाभारतीय क्रिकेट संघ