ठळक मुद्दे महाराष्ट्राचे दोन्ही संघ उपविजेतेपदावर समाधानी
बेमातारा : रेल्वेच्या संघाने जोरदार कामगिरीच्या जोरावर महाराष्ट्राला नमवित छत्तीसगढ हौशी खो-खो संघटना आयोजित 53 व्या वरिष्ठ राष्ट्रीय खो-खो अजिंक्यपद स्पर्धेत पुरुष गटाचे जेतेपद मिळवले तर, महिला गटात एअरपोर्ट अॅथोरिटी ऑफ इंडियाने बाजी मारली. अॅलन्स पब्लिक स्कूल ग्राऊंड येथे ही स्पर्धा पार पडली.
पुरुष गटाच्या अंतिम सामन्यामध्ये चांगली चुरस ही पहायला मिळाली. गतविजेता महाराष्ट्र संघ व गेल्या वर्षीचा उपविजेता रेल्वे जेतेपदासाठी चांगले खेळताना दिसले. पण, रेल्वेला जेतेपद मिळवण्यात यश मिळाले. अवघ्या एका गुणाने महाराष्ट्राला पराभूत व्हावे लागले. रेल्वेच्या विजय हजारेने आक्रमण व बचाव दोन्ही ठिकाणी चमक दाखवली. त्याने दोन मिनिटाहून अधिक काळ बचाव करण्यासोबत 4 गड्यांना बाद केले. त्यामुळे रेल्वेने 15-14 असा विजय नोंदवला.
महाराष्ट्राच्या महिला संघाने गेल्या वर्षीच्या उपविजेत्या एअरपोर्ट अॅथोरिटी ऑफ इंडियाला (एएआय) चांगले आव्हान दिले. पण, महाराष्ट्राला विजय मिळवण्यात अपयश आले. महाराष्ट्राच्या महिला संघाला 8-9 असे पराभूत व्हावे लागले.
महाराष्ट्राच्या पुरुष संघाकडून महेश शिंदेने अष्टपैलू कामगिरी केली. त्याने आक्रमणात तीन गुण व बचावात तीन मिनिटे असे योगदान दिले तर, महिलांमध्ये रेश्मा राहोडने तीन मिनिटे बचाव केला. पण, अंतिम सामन्यातील त्यांची ही कामगिरी संघाला जेतेपद मिळवून देऊ शकली नाही.
त्यापुर्वी महाराष्ट्राच्या संघाने दोन्ही गटाच्या उपांत्यसामन्यात कोल्हापूर संघाला नमवित अंतिम फेरी गाठली. पुरुष गटात महाराष्ट्र संघाने कोल्हापूरला 21-14 असे तर, महिला गटात चुरशीच्या झालेल्या लढतीत महाराष्ट्राने कोल्हापूर संघावर 8-7 असा विजय नोंदवला.
Web Title: National Kho Kho: railway won the tittle by beating Maharashtra in final
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.