Join us  

राष्ट्रीय निवडकर्ते देवांग गांधी यांना काढले ड्रेसिंग रुमबाहेर

रणजी सामन्यातील घटना : ईडन गार्डनवर घडले मानापमान नाट्य

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2019 3:00 AM

Open in App

कोलकाता : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) राष्टÑीय निवड समितीचे सदस्य देवांग गांधी यांनी गुरुवारी स्वत:वर नामुष्की ओढवून घेतली. भ्रष्टाचार विरोधी प्रोटोकॉलचे उल्लंघन केल्याने त्यांना बंगाल रणजी संघाच्या ड्रेसिंग रुममधून चक्क बाहेर काढण्यात आले. गांधी यांनी मात्र हे आरोप फेटाळले.

बंगाल विरुद्ध आंध्र प्रदेश या रणजी चषक सामन्यादरम्यान ही घटना घडली. अंधुक प्रकाशामुळे खेळ थांबला त्यावेळी गांधी बंगालच्या फिजिओची भेट घेण्यास ड्रेसिंग रुममध्ये पोहोचले होते. बंगालचा माजी कर्णधार मनोज तिवारी याने यावर आक्षेप नोंदवताच भ्रष्टाचार विरोधी अधिकारी सोमन कर्माकर यांनी गांधी यांना बाहेर जाण्याचे निर्देश दिले. प्रोटोकॉलनुसार केवळ खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ हेच ड्रेसिंग रुममध्ये थांबू शकतो. तिवारी म्हणाला, ‘आम्हाला भ्रष्टाचार विरोधी प्रोटोकॉलचे पालन करायलाच हवे. राष्टÑीय निवडकर्ते विनापरवानगी ड्रेसिंग रुममध्ये प्रवेश करू शकत नाही.’ गांधी यांनी मात्र ड्रेसिंग रुममध्ये जाण्याआधी मी कर्माकर यांची रीतसर परवानगी घेतली होती, असे स्पष्ट केले.वृत्तसंस्थेशी बोलताना गांधी पुढे म्हणाले, ‘मी प्रोटोकॉलचे पूर्ण पालन केले. मला बंगालचे प्रशिक्षक अरुण लाल यांनी ड्रेसिंग रुममध्ये आमंत्रित केले होते. ते माझे पहिले कर्णधार होते. माझ्या पाठीत दुखणे असल्याने मी त्यांची परवानगी घेत बंगालच्या फिजिओला डॉक्टर रुममध्ये येण्यास सांगितले. मात्र मनोजला यावरआक्षेप असावा.’ गरज नसताना तिवारीने या घटनेला वेगळे वळण दिले. तिवारी दोन सत्रात गांधी यांच्या नेतृत्वात रणजी स्पर्धेतील सामने खेळला होता.गांधी पुढे म्हणाले, ‘या घटनेचे केवळ मला नाही तर बंगाल क्रिकेटशी संबंधित अनेकांना वाईट वाटले. माझे मनोजसोबत मतभेद नाहीत. त्यानेअसे करीत युवा खेळाडूंमध्ये खराब उदाहरण सादर केले.’ सूत्रांच्या मते,हे प्रकरण बीसीसीआयचे अध्यक्षसौरव गांगुली यांच्यापर्यंत पोहोचविण्यात आले आहे. (वृत्तसंस्था)नियमाचे उल्लंघन नाही- कॅबदेवांग गांधी हे राष्टÑीय निवडकर्ते आहेत. सामना थांबला असताना ते ड्रेसिंग रुममध्ये जाण्यास इच्छुक होते. त्यासाठी त्यांनी एसीयूच्या अधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी घेतली होती. त्यांना स्वत:च्या पाठीच्या दुखण्यावर उपचार करून घ्यायचे असल्याने खेळाडूंच्या क्षेत्राबाहेर असलेल्या वैद्यकीय रुममध्ये उपचार करून घेण्यास त्यांना सांगण्यात आले. या घटनेत कुठलेही नियमांचे उल्लंघन झाले नसल्याची माहिती बंगाल क्रिकेट असोसिएशनने (कॅब) दिली. 

टॅग्स :रणजी करंडककोलकाता उत्तर