duleep trophy 2024 : बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी भारतीय खेळाडू दुलीप ट्रॉफीची स्पर्धा खेळत आहेत. यातून रोहित शर्मा, विराट कोहली आणि जसप्रीत बुमराहला विश्रांती देण्यात आली आहे. ५ तारखेला भारत अ विरुद्ध भारत ब आणि भारत क विरुद्ध भारत ड यांच्यात सामना सुरू झाला आहे. मुशीर खान, नवदीप सैनी, अक्षर पटेल आणि बाबा इंद्रजीत या शिलेदारांनी आपल्या चमकदार खेळीने सर्वांना प्रभावित केले. भारत अ विरुद्ध भारत ब या सामन्याबद्दल भाष्य करायचे झाले तर, नवदीप सैनीने अष्टपैलू खेळी करण्याची किमया साधली. अर्धशतकी खेळीसह त्याने गोलंदाजीतही कमाल केली. सैनीने ५६ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली.
गोलंदाजी करताना नवदीप सैनीने प्रतिस्पर्धी संघाचा कर्णधार शुबमन गिल आणि मयंक अग्रवाल यांसारख्या घातक फलंदाजांना बाहेरचा रस्ता दाखवला. सैनीने अप्रतिम चेंडू टाकून गिलला बाहेरचा रस्ता दाखवला. खरे तर गिल देखील चेंडूकडे पाहतच राहिला. इनस्विंग झालेला चेंडू गिलला चकमा देऊन थेट स्टम्पला जाऊन धडकला.
या डावात शुबमन गिलने ४३ चेंडूत ३ चौकारांच्या मदतीने २५ धावांची साजेशी खेळी केली. चांगल्या लयनुसार फलंदाजी करत असलेल्या मयंक अग्रवालला देखील नवदीप सैनीने बाद केले. तो ४४ चेंडूत ३६ धावा करुन तंबूत परतला. यष्टीरक्षक रिषभ पंतने अप्रतिम झेल घेऊन अग्रवालच्या खेळीला ब्रेक लावला.
मुशीर खानने सामना गाजवलाभारत ब संघाकडून खेळत असलेला मुशीर खान शतक झळकावण्यात यशस्वी झाला. १९ वर्षीय मुशीरने प्रथम श्रेणीतील आपले तिसरे शतक झळकावले. नवदीप सैनीने आणि मुशीर या दोघांनी आठव्या मोलाची भागीदारी करत संघाला सावरले. एकवेळ भारत ब संघ ७ बाद ९४ अशा संकटात होता. यशस्वी जैस्वाल (३०) व अभिमन्यू ईश्वरन (१३) यांनी ३३ धावांची सलामी दिली. चौदाव्या षटकात अभिमन्यू बाद झाल्यानंतर मुशीर मैदानात आला. पहिल्यांदाच या स्पर्धेत खेळणाऱ्या मुशीरने उसळणाऱ्या चेंडूंचा संयमाने सामना केला.