अफगाणिस्तानचा जलदगती गोलंदाज नवीन उल हक आयपीएल २०२३ दरम्यान चुकीच्या कारणांमुळे चर्चेत आला होता. त्याने विराट कोहलीसोबत मैदानावर भांडण केले होते. लखनौ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील साखळी फेरीतील सामन्यादरम्यान दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली होती आणि हस्तांदोलनाच्या वेळी प्रकरण हाताबाहेर गेले होते. खेळाडूंमधील हस्तांदोलनानंतर LSG चा मार्गदर्शक गौतम गंभीर नवीनसाठी उभा राहिला आणि कोहलीला भिडला. या भांडणानंतर कोहलीच्या चाहत्यांनी संपूर्ण स्पर्धेदरम्यान नवीन आणि गंभीरला ट्रोल केले.
एका महिन्यानंतर नवीनने आपले मौन सोडले आणि त्या भांडणासाठी RCBच्या सलामीवीराला जबाबदार धरले आहे. बीबीसीशी बोलताना नवीन म्हणाला, “त्याने सामन्यादरम्यान आणि नंतर त्या गोष्टी बोलायला नको होत्या. मी भांडण सुरू केलं नाही. सामना संपल्यानंतर जेव्हा आम्ही हस्तांदोलन करत होतो, तेव्हा विराट कोहलीने भांडणाला सुरूवात केली. जेव्हा तुम्ही या प्रकरणात सुणावण्यात आलेला दंड पाहाल, तेव्हा तुम्हाला समजेल की भांडण कोणी सुरू केलं.''
“मला फक्त एक गोष्ट सांगायची आहे की, मी सहसा कोणाची स्लेजिंग करत नाही. गोलंदाज असल्याने फक्त गोलंदाजी करतानाच मी स्लेजिंग करेन, अन्यथा नाही. त्या सामन्यात मी एक शब्दही उच्चारला नाही. मी कोणावरही स्लेज केले नाही. तिथे उपस्थित असलेल्या खेळाडूंना हे माहित आहे की मी परिस्थितीचा कसा सामना केला,” असेही तो पुढे म्हणाला.
त्या वादानंतर कोहली आणि गंभीर यांना त्यांच्या मॅच फीच्या १०० टक्के, तर नवीनला त्याच्या मॅच फीच्या ५० टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. RCB प्लेऑफसाठी पात्र ठरू शकला नाही आणि सीझनच्या लीग स्टेजमधून बाहेर पडला. कृणाल पांड्याच्या नेतृत्वाखालील LSGने गुणतालिकेत तिसरे स्थान पटकावून प्ले ऑफमध्ये स्थान मिळवले. एलिमिनेटरमध्ये त्यांना मुंबई इंडियन्सकडून ८१ धावांच्या मोठ्या फरकाने पराभव पत्करावा लागला.