Naveen Ul Haq on Virat Kohli, IPL 2023: बुधवारी झालेल्या एलिमिनेटर सामन्यात मुंबई इंडियन्सने लखनौ सुपर जायंट्सचा 81 धावांनी पराभव केला. त्यानंतर सलग दुसऱ्या वर्षी आयपीएल प्लेऑफमध्ये पोहोचूनही LSG संघाचे ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न भंगले. नवीन-उल-हक क्रिकेटच्या मैदानावर आणि सोशल मीडियावर त्याच्या काही कृत्यांमुळे भारतीय चाहत्यांच्या निशाण्यावर आला. IPL 2023 मध्ये विराट कोहलीसोबत झालेल्या संघर्षानंतर नवीन-उल-हक सोशल मीडियावर आपल्या पोस्ट्सद्वारे सातत्याने चर्चेत असतो. पण आता त्याने थेट पत्रकार परिषदेत विराटसोबतच्या वादावर मौन सोडले.
कोहलीसोबत झालेल्या वादावर नवीन म्हणाला...
लखनौ सुपर जायंट्स आयपीएल 2023 मधून बाहेर पडल्यानंतर नवीन उल हकला त्याच्या देशात अफगाणिस्तानला परतावे लागले. भारत सोडण्यापूर्वी या वेगवान गोलंदाजाने विराट कोहलीसोबतच्या वादाबद्दल मोठे वक्तव्य केले आहे. नवीन-उल-हक म्हणाला की, त्याला बुधवारी स्टेडियममध्ये 'कोहली, कोहली' म्हणण्याचा आनंद झाला कारण यामुळे त्याला त्याच्या संघासाठी चांगली कामगिरी करण्याची प्रेरणा मिळाली. नवीन आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा स्टार फलंदाज कोहली यांच्यात सध्या सुरू असलेल्या आयपीएलच्या लीग टप्प्यात जोरदार वाद झाला होता. त्याबद्दल त्याने प्रतिक्रिया दिली.
भारत सोडण्यापूर्वी दिली तिखट प्रतिक्रिया
मुंबईविरुद्धच्या एलिमिनेटरमध्ये ३८ धावांत चार बळी घेणारा नवीन म्हणाला, "मला मजा आली. मला मैदानावरील प्रत्येकाने त्याचे (विराट कोहली) किंवा इतर कोणत्याही खेळाडूचे नाव घेणे आवडते. यामुळे मला माझ्या संघासाठी चांगली कामगिरी करण्याची प्रेरणा मिळते. मी बाह्य गोष्टींचा विचार करत नाही. मी फक्त माझ्या क्रिकेट आणि माझ्या प्रक्रियेवर लक्ष केंद्रित करतो. श्रोत्यांच्या घोषणांचा किंवा इतर कोणी काय म्हणतो याचा माझ्यावर परिणाम होत नाही. व्यावसायिक खेळाडू म्हणून तुम्हाला जे घडते त्याच्यासोबतच पुढे जावे लागते. जेव्हा तुम्ही तुमच्या संघासाठी चांगली कामगिरी करत नाही, तेव्हा चाहते तुम्हाला लक्ष्य करतात. जेव्हा तुम्ही तुमच्या संघासाठी चांगले काम करता तेव्हा हे लोक तुमचे कौतुक करतात. तो खेळाचा एक भाग आहे" असेही नवीन उल हक म्हणाला.