भारताचे माजी खेळाडू आणि समालोचक नवज्योतसिंग सिद्धू आपल्या आवाजानं क्रिकेटप्रेमींचं मनोरंजन करण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज झाले आहेत. कारण आयपीएल २०२४ च्या माध्यमातून दिग्गज समालोचक नवज्योतसिंग सिद्धू यांची झलक पुन्हा एकदा चाहत्यांना अनुभवता येणार आहे. सिद्धू यांनी अप्रतिम समालोचनाच्या जोरावर आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. चाहत्यांना सामन्यात जिवंत ठेवण्यात ते माहिर आहेत. एका दशकानंतर त्यांची समालोचनाच्या क्षेत्रात पुन्हा एकदा एन्ट्री होत आहे.
सिद्धू पुन्हा एकदा समालोचनाच्या भूमिकेत दिसणार आहेत. त्यांनी पीटीआय या वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले की, मी क्रिकेटमधून बाहेर पडल्यानंतर समालोचनाकडे वळलो, इथं मी नक्कीच काहीतरी वेगळं करू शकतो असं मला जाणवायचं. मला सुरुवातीला एवढा आत्मविश्वास नव्हता पण १०-१५ दिवसांनी विश्वचषकादरम्यान माझा जम बसला. ६०-७० लाख रूपये संपूर्ण स्पर्धेसाठी घेणारा मी आयपीएलमध्ये एका सामन्यासाठी २५ लाख रूपये देखील घ्यायचो. केवळ पैशात समाधान नसते पण त्यासाठी घेतलेल्या मेहनतीत आणि आपण गाठलेल्या उंचीमुळं नक्कीच समाधान वाटते.
दरम्यान, आयपीएलचा पहिला सामना २२ मार्च रोजी चेन्नईच्या चिदंबरम स्टेडियमवर गतविजेता चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) यांच्यात होणार आहे. दरम्यान, IPL ब्रॉडकास्टर स्टार स्पोर्ट्सने सोशल मीडियाद्वारे नवज्योतसिंग सिद्धू यांना कॉमेंट्री पॅनलमध्ये सामील केल्याची माहिती दिली. स्टार स्पोर्ट्सने पोस्ट केली की, अत्यंत हुशार, महान नवज्योतसिंग सिद्धू आमच्या पॅनलमध्ये सामील झाले आहेत. त्यांची अप्रतिम कॉमेंट्री आणि शानदार वन लाइनर्स चुकवू नका. सिद्धू यांच्या आगळ्या-वेगळ्या कॉमेंट्रीचा मोठा चाहता वर्ग आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा कॉमेंट्री करताना पाहणे क्रिकेटप्रेमींसाठी पर्वणीच असेल.
नवज्योतसिंग सिद्धूंची क्रिकेट कारकीर्दमाजी खेळाडू नवज्योतसिंग सिद्धू यांची आंतरराष्ट्रीय कारकीर्द १५ वर्षे चालली. १९८३ ते १९९८ पर्यंत त्यांनी भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले. या काळात सिद्धूंनी ५१ कसोटी आणि १३६ वन डे सामने खेळले. त्यांनी कसोटीत ३२०३ धावा आणि वन डे सामन्यात ४४१३ धावा केल्या. आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत त्यांनी १५ शतके आणि ४८ अर्धशतकेही झळकावली आहेत.