बडोदा - मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याच्याव्यतिरिक्त आणखी एका माजी भारतीय क्रिकेटरच्या मुलाच्या नावाची सध्या चर्चा सुरु आहे जो भारतीय क्रिकेट संघाकडून खेळण्याची शक्यता आहे. ते नाव म्हणजे माजी विकेट कीपर नयन मोंगियाचा मुलगा मोहित. कूच बिहार ट्रॉफत बडोदा संघाचं नेतृत्व करणा-या मोहितने जवळपास 30 वर्षानंतर आपल्याच वडिलांचा सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम मोडला आहे.
वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत क्रिकेटर झालेल्या मोहितने मुंबईविरोधात फक्त 246 चेंडूत नाबाद 240 धावा करत आपल्या वडिलांचा विक्रम मोडीत काढला आहे. बडोदा संघाची हा आतापर्यंत सर्वोत्कृष्ट धावसंख्या आहे. याआधी 1988 मध्ये नयन मोगिंयाने केरळविरोधात 224 धावा केल्या होत्या. कूच बिहार ट्रॉफीसाठी बडोदा संघातील खेळाडूने केलेली ही सर्वोच्च धावसंख्या होती.
आपला विक्रम आपल्याच मुलाने मोडला असल्याचं कळल्यानंतर नयन मोंगियाने आनंद व्यक्त केला. 'माझ्या मुलाने हा विक्रम मोडल्याने मी आनंदी आहे. हे अविश्वसनीय वाटत आहे. मोहित धडाकेबाजपणे खेळत आहे. तो हा विक्रम करण्याच्या लायक आहे. मोहितने मला फोन केला होता. त्याच्या या खेळीमुळे मी प्रचंड खूश आहे', अशी प्रतिक्रिया नयन मोंगियाने दिली आहे.
विशेष म्हणजे मोहितला आपण वडिलांचा रेकॉर्ड मोडला असल्याची कल्पनाच नव्हती असं नयन मोंगियाने सांगितलं. त्याची आई तनूने त्याला तू वडिलांचा रेकॉर्ड मोडला आहेस हे सांगितलं. मुलाच्या यशामुळे तीदेखील आनंदित आहेत. नयन मोंगिया भारतीय क्रिकेट संघात विकेट कीपर होते. पण मोहित मात्र लेफ्ट आर्म स्पिनर आहे. तो एक उत्तम फलंदाजदेखील आहे.
भारताकडून 44 कसोटी आणि 140 वन डे सामने खेळणा-या नयन मोंगियाने पुढे बोलताना सांगितलं की, 'मी त्याला इतक्यावर संतृष्ट होऊ नको असा सल्ला दिला आहे. त्याला पुढेही आपली खेळी अशीच सुरु ठेवावी लागणार आहे'. नयन मोंगियाला त्याच्या आणि मोहितच्या बॅटिंगमध्ये फरक असल्याचं विचारल्यानंतर तो बोलला की, 'हो नक्कीच आहे. मोहित अत्यंत फ्लोमध्ये बँटिंग करतो. त्याचा काऊंटर अटॅक चांगला आहे. मी सुरुवातीला हळू खेळायचो, पण जेव्हा चेंडूवर नजर बसायची तेव्हा शॉट्स खेळण्यास सुरुवात करायचो'.
या सामन्यात केरळने प्रथम फलंदाजी करत 370 धावा केल्या होत्या. मोहितची डबल सेंच्युरी, शिवालिक शर्माच्या 76 धावा आणि उर्विक पटेलच्या 52 धावांच्या मदतीने बडोदाने दिवसाअखेर सात विकेट्स गमावत 409 धावा केल्या. मोहित अजूनही नाबाद खेळत आहे. नुकतीच त्याच्यावर कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.