England vs Netherland ODI : जोस बटलर ( Jos Buttler), फिल सॉल्ट ( Phil Salt ) व डेवीड मलान ( Dawid Malan ) या इंग्लंडच्या फलंदाजांनी नेदरलँड्सच्या गोलंदाजांचा पालापाचोळा केला. फिल सॉल्ट व डेवीड मलान यांनी २२२ धावांची भागीदारी करून मजबूत पाया रचला. त्यानंतर जोस बटलरचे वादळ घोंगावले. त्याला लिएम लिव्हिंगस्टोनची ( Liam Livingstone) साथ मिळाली आणि या दोघांनी १२ षटकांत १९८ धावांची खेळी केली. इंग्लंडने वन डे क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम पुन्हा नावावर करताना ४ बाद ४९८ धावा केल्या.
जेसन रॉय व फिल सॉल्ट ही जोडी सलामीला आली, परंतु शेन स्नॅटरने दुसऱ्या षटकात इंग्लंडला धक्का दिला. त्याने जेसन रॉयचा ( १) त्रिफळा उडवला. पण, त्यानंतर सॉल्ट व मलान या जोडीने दमदार खेळ केला आहे. ९३ चेंडूंत १४ चौकार ३ षटकार खेचून सॉल्ट १२२ धावांवर माघारी परतला. त्यानंतर डेव्हिड मलानने वन डेतील पहिले शतक झळकावताना मोठ्या विक्रमाला गवसणी घातली. जोस बटलरनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तीनही फॉरमॅटमध्ये शतक झळकावणारा मलान हा इंग्लंडचा दुसरा फलंदाज ठरला. मलान १०९ चेंडूंत ९ चौकार व ३ षटकारांसह १२५ धावांवर बाद झाला. त्याने बटलरसह तिसऱ्या विकेटसाठी ९० चेंडूंत १८४ धावांची भागीदारी केली, परंतु त्यापैकी १३९ धावा या बटलरने ६० चेंडूंत कुटल्या होत्या.
लिएम लिव्हिंगस्टोनने १७ चेंडूंत ५ चौकार व ५ षटकारांच्या मदतीने अर्धशतक पूर्ण केले. इंग्लंडकडून हे सर्वात जलद अर्धशतक ठरले. यापूर्वी इय़ॉन मॉर्गनने २१ चेंडूंत २०१८मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध अर्धशतक झळकावले होते. बटलरने ६५ चेंडूंत १५० धावा करताना वन डेतील दुसरे जलद १५० धावा करण्याचा विक्रम केला. इंग्लंडने ४ बाद ४९८ धावा करताना वन डे क्रिकेटमध्ये नव्या वर्ल्ड रेकॉर्डची नोंद केली. त्यांनी स्वतःचाच ६ बाद ४८१ ( वि. ऑस्ट्रेलिया, २०१८) धावांचा विक्रम मोडला. बटलर ७० चेंडूंत ७ चौकार व १४ षटकारांसह १६२ धावांवर, तर लिव्हिंगस्टोन २२ चेंडूंत ६ चौकार व ६ षटकारांसह ६६ धावांवर नाबाद राहिला.
Web Title: NED vs ENG : Jos Buttler scored unbeaten 162 runs in 70 balls, with the 7 fours and 14 sixes, break many records Watch Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.