व्ही. व्ही. एस. लक्ष्मण -
मंगळवारी तिसऱ्या टी-२० मध्ये पहिल्या सामन्याची पुनरावृत्ती झाली. पॉवर प्लेमध्ये भारताने तीन फलंदाज गमावले होते. सुरुवातीला सहा षटकात दोन गडी गमावणाऱ्या संघाला चार सामन्यात एकदाच विजय मिळाला, ही आकडेवारी सांगते. विराटने उत्कृष्ट फलंदाजी करीत संघाला संकटातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचे प्रयत्न निष्फळ ठरले.
नाणेफेक जिंकल्यानंतर लाल मातीचा लेप असलेली खेळपट्टी इंग्लंडला पूरक ठरली. आर्चर आणि मार्क वूड यांचे उसळी घेणारे चेंडू खेळणे भारतीय फलंदाजांना जड गेले. संयमी सुरुवात करूनही आघाडीची फळी कोसळलीच. सुरुवातीच्या दोन सामन्यातून बाहेर असलेला रोहित शर्मा आणि लोकेश राहुल पूर्णपणे ऑफ फॉर्म जाणवले. त्यांना स्वत:चे तंत्र सुधारावे लागेल. राहुलचे फूटवर्क चुकीचे आहे. चेंडूच्या रेषेत न येताच तो फटका मारण्याचा प्रयत्न करतो. याशिवाय काही निर्णय चुकीचे ठरले. त्यामागे संघ व्यवस्थापनाचा वेगळा विचार असू शकेल. तरीही पदार्पणात आकर्षक अर्धशतकी खेळी करणारा ईशान किशन याचा फलंदाजी क्रम बदलण्याची गरज नव्हती, असे वाटते. याशिवाय फलंदाजीची संधी न देताच सूर्यकुमार यादवला बाहेर बसविण्यात आले.
एकवेळ २५ चेंडूत २४ धावा काढणाऱ्या कोहलीने धावांचा वेग वाढवून ४६ चेंडूत ७७ धावा ठोकल्या. सुरुवातीच्या धक्क्यातून सावरण्याचे काम मधल्या फळीने केले. ऋषभ पंत आणि हार्दिक पांड्यासोबत भागीदारी करीत कोहलीने सन्मानजनक स्थितीत आणले होते. भारताला पहिल्या षटकात बळी घेण्याची गरज होती. त्यासाठी युजवेंद्र चहल याला पॉवर प्लेमध्ये संधी देण्यात आली. बटलरने मात्र भारतीयांना प्रत्येक वेळी बॅकफूटवर आणले. त्याने सहजपणे चौकार हाणलेच, शिवाय लेग स्टम्पच्या रेषेत येणाऱ्या चेंडूंवर शिताफीने रिव्हर्स तसेच स्वीच हिटचे फटकेही मारले.
भारताने संघ संयोजनावर विचार करायला हवा. परिस्थितीनुरूप गोलंदाजीचा पर्यायदेखील उपलब्ध ठेवावा लागेल. मागच्या तीनपैकी दोन सामन्यातील अनुभव लक्षात घेता, फलंदाजीचा क्रम कायम राखणे मोलाचे ठरणार आहे. नव्या आक्रमक रणनीतीतील या उणिवा म्हणता येतील. तथापि ही सवय बनू नये, याची काळजी घ्यावी. मागच्या पाच दिवसातील घडामोडींवर अन्य प्रतिस्पर्धी संघांची जवळून नजर असावी.
Web Title: The need to implement a new offensive strategy, the option to keep the bowling according to the situation
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.