- व्हीव्हीएस लक्ष्मण लिहितात...
आज बुधवारपासून इंग्लंडविरुद्ध सुरू होत असलेल्या मालिकेत इंग्लंडला धूळ चारण्याइतपत फौजफाटा आपल्याकडे आहे, यावर विश्वास ठेवूनच विराट कोहलीने सामोरे जायला हवे. द. आफ्रिकेविरुद्ध मिळालेल्या मालिका विजयाचा रथ इंग्लंडमध्येही दौडविण्याची हीच खरी संधी असल्याचा माझादेखील विश्वास आहे.
भारताकडे फलंदाजीत अनेक पर्याय आहेत. या संघातील प्रत्येकजण इंग्लंडमध्ये कसोटी खेळण्याचा अनुभव राखतो. ही भारताच्या जमेची बाब म्हणावी लागेल. सन २०१४ मध्ये बऱ्याच फलंदाजांनी इंग्लंड दौरा केला आहे. या फलंदाजांना खेळण्याचा पुरेसा अनुभव असल्याने इंग्लंडकडून ज्या क्लृप्त्या अवलंबल्या जातील त्यांना समर्थपणे तोंड देण्यास फलंदाज सक्षम असावेत. विदेशात खेळताना तेथील परिस्थितीशी एकरूप होत पहिल्या डावात धावांचा डोंगर उभारणे देखील गरजेचे असेल. विशेषत: विदेशात खेळताना पहिल्या डावातील धावसंख्या विजयाचा पाया उभारण्यास उपयुक्त ठरते.
गोलंदाजीतही भारताकडे विविधता असून जसप्रीत बुमराह आणि भुवनेश्वर कुमार यांची उणीव जाणवणार नाही इतपत आमचा मारा भेदक नक्कीच आहे.
भारताने पहिल्या कसोटीत शिखर धवनला सलामीला खेळण्यावर ठाम असावे. तो मर्यादित षटकांप्रमाणे कसोटीतही मोठी फटकेबाजी करत चांगली सुरुवात करून देतो, जेम्स अँडरसन किंवा स्टुअर्ट ब्रॉड यांचा मारा बोथट करण्यासाठी शिखर उपयुक्त ठरेल. माझ्या मते गोलंदाजीतही रविचंद्रन अश्विन आणि कुलदीप यादव संघात असायला हवे. यावेळी हवामान शुष्क राहील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. या स्थितीचा लाभ घेत दोघेही गडी बाद करण्यात पटाईत ठरू शकतील. हार्दिक पांड्या फलंदाजीसह गोलंदाजीत उमेश यादव आणि ईशांत शर्मा यांच्या सोबतीने नवा चेंडू हाताळण्यास सक्षम वाटतो. मोहम्मद शमीला संधी देणे योग्य ठरेल, यावर माझा विश्वास नाही.
Web Title: Need a lead in the first innings
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.