नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेमध्ये पहिली कसोटी मालिका जिंकण्यासाठी नशिबाचीही थोडी साथ हवी, असे मत भारतीय संघाचे मुख्य कोच राहुल द्रविड यांनी मंगळवारी मांडले. भारत १९९२ पासून या देशाचा दाैरा करीत आहे. मात्र ३१ वर्षांत आठ दौऱ्यात द. आफ्रिकेत केवळ चारच कसोटी सामने जिंकले. याउलट भारताने इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये कसोटी मालिका जिंकल्या आहेत.
भारतीय संघ द. आफ्रिका दौऱ्यात २३ कसोटींपैकी चार सामने जिंकू शकला. दोन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्याआधी ‘स्टार स्पोर्ट्स’ शी संवाद साधताना द्रविड म्हणाले, ‘आम्ही येथे अनेकदा चांगला खेळ केला, शिवाय विजयाच्या निकट पोहोचलो. मोक्याच्या क्षणी मात्र वर्चस्व गाजविण्यात अपयशी ठरलो. ४०-५० धावा आणखी केल्या असत्या तर आव्हान तगडे ठरले असते, असा विचार मनात वारंवार यायचा. दोन वर्षांआधीच्या दौऱ्यात आमच्या संघाने गोलंदाजीत जे वर्चस्व गाजविले, त्यापासून प्रेरणा घेत आत्मविश्वास कायम राखावा लागेल. मागच्या वेळी आम्ही पहिला सामना जिंकून १-० ने पुढे होतो, पण मालिका अखेर १-२ ने गमावली. सध्याच्या संघातही २० बळी घेण्याची क्षमता असलेले गोलंदाज आहेत.’
‘दक्षिण आफ्रिकेतील परिस्थितीत विजयासाठी थोडी नशिबाचीही साथ लाभायला हवी. अनेक संधी हातून निसटतात. अनेकदा चेंडू बॅटच्या अगदी जवळून निघून जातो. प्रतिस्पर्धी फलंदाजाच्या बॅटला चेंडू लागला असता तर, असे आपल्याला वाटत असते. तथापि, चेंडू योग्य दिशेने आणि कौशल्याने टाकणार असाल तर आपल्याला नशिबाची साथ मिळू शकते. अशावेळी संयम आणि शिस्त कायम राखायला हवी,’ असे द्रविड यांनी सांगितले.
प्रसिद्ध चांगला गोलंदाज
पदार्पण करणारा वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाबाबत विचारताच द्रविड म्हणाले, ‘प्रसिद्ध चांगला गोलंदाज आहे, पण खरे सांगायचे तर त्याची ही पहिलीच कसोटी. अनेक कारणांमुळे त्याच्याकडे प्रथम श्रेणीचा पुरेसा अनुभव नाही. एखाद्याला पदार्पणाची कॅप मिळणे हा त्याच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण असतो. प्रसिद्धसाठी हा मोठा क्षण आहे. त्याला खेळाचा आनंद घेऊ द्या!’