प्रॉव्हिडन्स : सुरुवातीचा सामना चार धावांनी गमविणाऱ्या टीम इंडियापुढे रविवारी होणारी दुसरी टी-२० लढत जिंकून वेस्ट इंडीजविरुद्ध पाच सामन्यांच्या मालिकेत बरोबरीचे अवघड आव्हान असेल.
आयपीएलचे स्टार ठरलेल्या अनेक खेळाडूंना ‘डेथ ओव्हर’मध्ये फलंदाजीत सुधारणा करावी लागणार आहे. यंदा वनडे विश्वचषकाचे आयोजन होणार असल्याने टी-२० चे तितकेसे औचित्य नाही. तरी कर्णधार हार्दिक पांड्या आणि उपकर्णधार सूर्यकुमार यादव यांना वैयक्तिक आणि सांघिकरीत्या उत्कृष्ट योगदान द्यावे लागेल. ईशान किशन, शुभमन गिल आणि संंजू सॅमसन यांच्या नजरा वनडे विश्वचषकाकडे आहेत. त्यादृष्टीने आशिया चषकाआधी चांगली खेळी करीत आत्मविश्वास उंचाविण्याची त्यांना संधी आहे. पदार्पण करणाऱ्यांपैकी तिलक वर्माचा अपवाद वगळता अन्य आयपीएल स्टार पहिल्या सामन्यात अपयशी ठरले होते.
नऊ दिवसांत पाच सामन्यांचे आयोजन होत असल्याने हार्दिक, गिल, ईशान, कुलदीप यादव यांना विश्रांती मिळणे गरजेचे आहे. हा युवा संघ असला तरी विश्रांतीशिवाय उसळी घेणाऱ्या खेळपट्ट्यांवर सलग खेळणे शक्य होणार नाही.
पुढचा टी-२० विश्वचषक अमेरिकेत होणार असल्याने भारताला पर्यायी खेळाडूंचा वेध घेण्याची हीच संधी असेल. भारताला फलंदाजीत उत्कृष्ट कामगिरी करायची झाल्यास यशस्वी जैस्वालला संधी मिळणे आवश्यक आहे. या मैदानावर झालेल्या ११ टी-२० पैकी तीन सामने पावसात वाहून गेले तर आठपैकी पाच सामन्यात यजमान संघाने बाजी मारली. कसोटी आणि वनडे मालिका गमविल्यानंतरही विंडीज संघ बलाढ्य वाटतो. या संघात निकोलस पूरन, काइल मेयर्स, शिमरोन हेटमायेर, रोवमॅन पॉवेल, रोमारियो शेफर्ड असे ‘बिग हिटर’ आहेत. भारताला सूर्याकडून मोठी खेळी अपेक्षित आहे. सॅमसनदेखील लौकिकाला साजेसा खेळ करण्यात अपयशी ठरतो. येथील जिवंत खेळपट्ट्यांवर युझवेंद्र चहल, अर्शदीपसिंग, आवेश आणि उमरान मलिक यांना वारंवार संधी देणे संघासाठी हितावह ठरू शकेल.