दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर विराट कोहलीनं ( Virat Kohli) भारतीय कसोटी संघाचे कर्णधारपद सोडण्याचा घेतलेला निर्णय हा धक्कादायक होता. विराटच्या या निर्णयानंतर आता टीम इंडियाचा पुढील कसोटी कर्णधार कोण, यावर अनेक क्रिकेट पंडित त्यांची मत मांडत आहेत. कसोटी संघाचा कर्णधार निवडण्याची कसरत आता बीसीसीआयला करावी लागणार आहे. अनेकांच्या मते रोहित शर्मा ( Rohit Sharma) हा या पदासाठी आघाडीवर आहे, परंतु महान फलंदाज सुनील गावस्कर ( Sunil Gavskar) यांच्या मते रोहित शर्मा या पदासाठी योग्य पर्याय नाही.
''असं होत राहिलं, तर तुम्हाला दुसऱ्याला कर्णधार बनवावं लागेल. त्यामुळे ज्या खेळाडूला अंतर्गत दुखापती नसतील त्याचीच कर्णधार म्हणून निवड करणे, योग्य ठरेल. रोहितला वारंवार दुखापत होत असते आणि त्यामुळे त्याच्याबाबत मी संभ्रमात आहे. त्यामुळेच तंदुरुस्त खेळाडू टीम इंडियाचा कर्णधार असावा असे मला वाटते,''असे गावस्कर म्हणाले.
कर्णधारपदावरून हकालपट्टी होऊ शकते या भीतीने निर्णय
दक्षिण आफ्रिकेविरुद्धची कसोटी मालिका गमावल्यानंतर आता कर्णधारपदावरून आपली हकालपट्टी होऊ शकते, याचा अंदाज बहुतेक विराट कोहलीला आला होता आणि गच्छंतीच्या भीतीने विराट कोहलीने हा निर्णय घेतला. दक्षिण आफ्रिकेविरुद्धची कसोटी मालिका भारत जिंकेल, असे वाटत होते. मात्र, १-२ ने मालिका भारतीय संघाने गमावली. अशा स्थितीत हा निर्णय घेणे विराटला गरजेचे झाले होते, असे मत गावस्कर यांनी व्यक्त केले होते. ते इंडिया टुडेशी बोलत होते. ही कसोटी मालिका भारतीय संघ ३-० ने जिंकेल, असा दावा त्यांनी केला होता. मात्र, तो फोल ठरला. मात्र, विराट कोहलीने कर्णधार म्हणून चांगली कामगिरी केली आहे, असे कौतुकही त्यांनी यावेळी बोलताना केले होते.