नवी दिल्ली : ‘महिला क्रिकेटच्या विकासाची योजना बीसीसीआयकडे आहे, मात्र त्याबाबत सविस्तर खुलासा करण्याची गरज असल्याचे मत,’ भारतीय महिला संघाची माजी कर्णधार आणि यशस्वी समालोचक अंजूम चोप्रा हिने व्यक्त केले आहे.
‘बीसीसीआय भारतीय महिला क्रिकेटच्या प्रगतीसाठी विचार करीत नाही, असे मुळीच नाही, मात्र महिला क्रिकेटसंदर्भात सविस्तर योजना पुढे आणण्याची खरी गरज आहे,’असे मत वृत्तसंस्थेशी बोलताना अंजूमने व्यक्त केले. ती म्हणाली,‘पुरुष क्रिकेटसाठी बीसीसीआयकडे ठोस योजना असतात. त्याची सविस्तर चर्चा होते.मात्र महिला क्रिकेटसाठी देखील ठोस योजना पुढे यायला हव्या,असे माझे मत आहे.’ कोरोनामुळे भारतीय महिला संघाचा सप्टेबरमध्ये असलेला इंग्लंड दौरा रद्द करण्यात आल्याने बीसीसीआयवर टीका झाली होती. अंजूमच्या मते,‘ हे चांगले झाले नाही. तथापि भारतीय महिला खेळाडू नोव्हेंबरमध्ये आयपीएल खेळून पुढील वर्षीच्या वन डे विश्वचषकाची तयारी करू शकतील. इंग्लंड दौऱ्यावर संघ पाठवायला हवा होता. कुठल्याही स्पर्धेसाठी उपलब्ध नसणे ही योग्य बाब नाही. मात्र यामागे अनेक तर्क असावे. तयारीविना संघ पाठविण्यास अर्थ नाही,हे देखील खरे.’ महिलांसाठी आयपीएल आयोजनाचे अंजूमने स्वागत केले. ती म्हणाली,‘ सौरव गांगुलींच्या नेतृत्वात बीसीसीआयने हे पाऊल उचलले याचा आनंद आहे.’अंजूमने १७ वर्षे आंतरराष्टÑीय क्रिकेट खेळले. सहा विश्वचषकात भारताचे प्रतिनिधित्व करण्याचा विक्रम अंजूच्या नावावर आहे. १०० वन डे खेळणारी ती पहिली महिला क्रिकेटपटू ठरली. (वृत्तसंस्था)