Join us  

मर्यादित षटकांच्या मानसिकतेतून बाहेर पडण्याची गरज

दिग्गजांच्या अनुपस्थितीत अनेक युवा प्रतिभावान खेळाडू गवसले.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2023 7:56 AM

Open in App

अयाज मेमन, कन्सल्टिंग एडिटर 

पांढऱ्या चेंडूच्या प्रकारात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टीम इंडियाची कामगिरी शानदार ठरली. टी-२० मालिका बरोबरीत सोडविल्यानंतर भारताने वनडे मालिकेत बाजी मारली.  या दोन्ही मालिकांमध्ये दिग्गजांच्या अनुपस्थितीत अनेक युवा प्रतिभावान खेळाडू गवसले. 

दोन्ही मालिकांमधून अनेक प्रश्नांची उत्तरे मिळाली. संजू सॅमसन, यशस्वी जैस्वाल, रवी बिश्नोई, अर्शदीपसिंग यांची कामगिरी नजरेत भरण्यासारखी झाली. या कामगिरीनंतर जूनमध्ये आयोजित टी-२० विश्वचषकासाठी संघ निवडताना डोकेदुखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. इतक्या प्रतिभावान खेळाडूंमधून कुणाला निवडावे आणि कुणाला गाळावे यावरून निवडकर्त्यांचा  गोंधळ उडू शकतो.

डब्ल्यूटीसीसाठी कसोटी मालिका मोलाची

सध्या भारतीय संघ कसोटीत कसा खेळेल, याकडे लक्ष लागले आहे.  २६ डिसेंबरपासून पहिली कसोटी खेळली जाईल. ही मालिका २०२३-२०२५ च्या डब्ल्यूटीसीचा भाग आहे. याची सुरुवातदेखील झाली. विदेशात मालिका जिंकून गुण मिळविल्यास पुन्हा एकदा डब्ल्यूटीसी अंतिम फेरी गाठणे सुकर होणार आहे. डब्ल्यूटीसीच्या गेल्या दोन सत्रांत भारत अंतिम सामना तर खेळला, तर दोन्ही वेळा उपविजेतेपदावरच समाधान मानावे लागले होते. तेव्हा पुन्हा फायनल खेळण्यासाठी ही मालिका जिंकावी लागेलच. शिवाय महत्त्वाची बाब म्हणजे भारताने दक्षिण आफ्रिकेत अद्याप कसोटी मालिका विजय साजरा केलेला नाही.

द. आफ्रिका संघ कडवा संघर्ष करतो. कधीही हार न मानण्याची त्यांची वृत्ती जगजाहीर आहे. कागदावर भारतीय संघ तगडा वाटत असला तरी दक्षिण आफ्रिका दौरा नेहमी आव्हानात्मक राहिला आहे. तेथील परिस्थितीशी जुळवून घेणे अवघड आव्हान असते. यजमान संघाचे वेगवान गोलंदाज आणि फलंदाज घरच्या खेळपट्ट्यांवर सहजपणे यशस्वी होतात. त्यांची क्रिकेट संस्कृती ऑस्ट्रेलियासारखीच शेवटपर्यंत हार न मानणारी आहे. या संघात ग्रॅमी स्मिथ, डेल स्टेन, जॅक कालिस, ए.बी. डिव्हिलियर्स, हाशीम आमला यांच्यासारखे खेळाडू नसतीलही; पण तरी सध्याचा संघ बलाढ्य आहे. विराट कोहली, रोहित शर्मा यांना या दौऱ्यात कठोर आव्हानांचा सामना करावा लागेल. 

भारताने दोन सामन्यांची कसोटी मालिका जिंकल्यास तो ऐतिहासिक विजय ठरेल. शिवाय डब्ल्यूटीसीसाठी महत्त्वपूर्ण गुण संपादन करता येतील. यामुळे गुणतालिकेत अव्वल स्थानावर विराजमान होता येईल. तेव्हा द. आफ्रिकेत वर्चस्व गाजविणे टीम इंडियापुढील मोठे आव्हान असेल. सर्वच खेळाडू काही महिन्यांपासून पांढऱ्या चेंडूच्या प्रकारात खेळत आहेत. आता पांढऱ्या चेंडूच्या मानसिकतेतून बाहेर पडून लाल चेंडूवर कामगिरीची सवय लावावी लागेल. लाल चेंडूवर खेळण्याचे तंत्र पूर्णत: वेगळे असते. भारतीय संघासाठी कसोटी क्रिकेट हे नेहमी आव्हानात्मक राहिले आहे.

अय्यर, राहुल, गिलला संधी

जखमी मोहम्मद शमी दौऱ्यात नाही. तरी भारतीय संघ पूर्ण ताकदीनिशी खेळणार आहे. शमी नसल्याने जसप्रीत बुमराह- शमी आणि सिराज यांचे त्रिकूट विखुरले. तरी भारतीय संघ भक्कम आहे. फिरकीची बाजू सांभाळण्यास अश्विन आणि जडेजा सक्षम असून, प्रतिस्पर्धी संघाला कोंडीत पकडू शकतात. फलंदाजीत शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, रोहित शर्मा, विराट कोहली, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर  यांच्याकडून मोठी खेळी अपेक्षित असेल. चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांच्या अनुपस्थितीत श्रेयस, राहुल, शुभमन गिल यांना प्रतिभा सिद्ध करण्याची मोठी संधी असेल.

 

टॅग्स :भारतद. आफ्रिका