भारताच्या माजी दिग्गज फिरकीपटू नीतू डेव्हिड यांचा बुधवारी आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये समावेश करण्यात आला. हा सन्मान मिळवणाऱ्या नीतू या भारताच्या केवळ दुसऱ्या महिला क्रिकेटपटू ठरल्या आहेत. त्याचवेळी, दक्षिण आफ्रिकेचा एबी डिव्हिलियर्स आणि इंग्लंडचा ॲलिस्टर स्टर कूक यांचाही आयसीसी हॉल ऑफ फेम समावेश करण्यात आला. भारतीय महिला संघाच्या निवड समितीच्या विद्यमान अध्यक्ष असलेल्या नीतू या माजी कर्णधार डायना एडुल्जी यांच्यानंतर हा मान मिळवणाऱ्या दुसऱ्या भारतीय महिला ठरल्या. नीतू, यांनी कसोटी क्रिकेटमध्ये भारताकडून एका डावात सर्वोत्तम गोलंदाजीचा विक्रम नोंदवला आहे. त्यांनी इंग्लंडविरुद्ध एका डावात ५३ धावांत ८ बळी घेतल्या होत्या.
नीतू यांनी भारतासाठी १० कसोटी व ९७ एकदिवसीय सामने खेळले आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये नीतू यांनी १४१ बळी घेतले असून, सर्वाधिक बळी घेणाऱ्यांमध्ये त्या दुसऱ्या क्रमांकाच्या भारतीय आहेत. तसेच एकदिवसीय क्रिकेटमध्ये बळींचे शतक पूर्ण करणाऱ्या नीतू पहिल्या भारतीय गोलंदाजही ठरल्या होत्या. नीतू यांनी म्हटले की, 'आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये समावेश होणे खूप सन्मानाची बाब आहे. या खेळाप्रति आयुष्यभर केलेल्या समर्पणानंतर हा मान मिळाला आहे.'
डिव्हिलियर्स, कूक यांचाही सन्मान इंग्लंडचा माजी कर्णधार ॲलिस्टर कूकने २५०हून अधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्याने २०१८ साली इंग्लंडकडून सर्वाधिक कसोटी शतके आणि धावा काढणारा फलंदाज म्हणून क्रिकेटमधून निरोप घेतला होता. होता. द. आफ्रिकेच्या एबी डिव्हिलियर्सने आपल्या १४ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत तिन्ही प्रकारांत मिळून २० हजारांहून अधिक धावा फटकवल्या आहेत.