Join us  

ना रोहित, ना यशस्वी! इरफान पठाणच्या IPL 2023 मधील सर्वोत्तम १२ खेळाडूंमध्ये कोणाची एन्ट्री?

IPL 2023 : इंडियन प्रीमिअर लीगचे १६ वे पर्व संपले... चेन्नई सुपर किंग्सने फायनलमध्ये गतविजेत्या गुजरात टायटन्सवर ५ विकेट्स राखून विजय मिळवला आणि पाचव्यांदा आयपीएलची ट्रॉफी उंचावली.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2023 5:20 PM

Open in App

यंदाच्या पर्वात रिंकू सिंग, तिलक वर्मा, साई सुदर्शन, यशस्वी जैस्वाल, आदी युवा खेळाडूंनी आपला दबदबा दाखवून दिला. काही भविष्यातील सुपरस्टारही या पर्वात पाहायला मिळाले, परंतु त्याचवेळी प्रस्थापितांच्या वर्चस्वाला धक्का लागण्याचे संकेतही मिळाले. यंदाच्या आयपीएलमध्ये सर्वाधिक १२ शतकं ठोकली गेली अन् त्यापैकी ३ शुबमन गिल व २ विराट कोहलीने झळकावली. पैसांचा पाऊस पाडून संघात घेतलेले बरेच खेळाडू अपयशी ठरले, परंतु कमी किमतीत आलेले स्टार बनले. 

भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण याने IPL 2023 मधील सर्वोत्तम १२ खेळाडू निवडले आहेत. मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा याच्यासाठी यंदाची आयपीएल निराशाजनक राहिली आणि त्यामुळे इरफानने त्याच्या संघात त्याला स्थान दिलेले नाही. तेच दुसरीकडे फॅफ ड्यू प्लेसिस, शुबमन गिल व विराट कोहली यांनी सातत्यपूर्ण कामगिरी केली. यशस्वी जैस्वाल व डेव्हॉन कॉनवे यांनीही ऑरेंज कॅपच्या शर्यतीत कडवी टक्कर दिली होती. पण, ८९० धावा करणारा शुबमन ऑरेंज कॅपचा मानकरी ठरला. इरफानच्या संघात फॅफ ड्यू प्लेसिस ( ७३० धावा) कर्णधार आहे आणि शुबमन व त्याला ओपनर म्हणून निवडले आहे.

६३९ धावा करणारा विराट कोहली मधल्या फळीत दिसतोय. सूर्यकुमार यादव ( ६०५) कडे मधल्या फळीची जबाबदारी आहे, तर यष्टिरक्षक-फलंदाज हेनरिच क्लासेन ( ४४८) व रिंकू सिंग ( ४७४) हे फिनिशर म्हणून संघात आहेत. रवींद्र जडेजा व राशीद खान यांची अष्टपैलू म्हणून निवड केली गेली असून नव्या चेंडूने मारा करण्यासाठी मोहम्मद शमी व मोहम्मद सिराज या जलदगती गोलंदाजांना संधी दिलेली आहे. शमीने यंदाच्या पर्वात २८ विकेट्स घेत पर्पल कॅप जिंकली आहे. मोहित शर्मा व मथिशा पथिराना यांना डेथ ओव्हर स्पेशालिस्ट म्हणून संघात निवडले आहे. 

 

टॅग्स :आयपीएल २०२३इरफान पठाणरोहित शर्माएफ ड्यु प्लेसीसविराट कोहली
Open in App