पुणे येथील एमसीएच्या गहुंजे स्टेडियमवर गुरुवारी झालेल्या दुसऱ्या टी-२० लढतीत श्रीलंकेने भारताचा १६ धावांनी पराभव करीत तीन सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. कर्णधार दासून शनाका (नाबाद ५६) आणि कुसाल मेंडिस (५२) यांच्या बेधडक फटकेबाजीच्या बळावर नाणेफेक गमावल्यानंतर लंकेने २० षटकात ६ बाद २०६ धावा उभारल्या. २०७ धावांचे लक्ष्य गाठणाऱ्या भारताला त्यांनी २० षटकात ८ बाद १९० धावांवर रोखले. तिसरा सामना शनिवारी राजकोट येथे खेळला जाईल.
टी-२० मालिका झाल्यानंतर श्रीलंकेविरुद्ध ३ सामन्यांची वन-डे मालिका देखील होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना १० जानेवारी रोजी गुवाहाटी येथील बारसापारा क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. आसाम क्रिकेट असोसिएशनने (एसीए) या सामन्यासाठी पूर्ण तयारी केली आहे. या स्टेडियममधील शेवटचा सामना २ ऑक्टोबर २०२२ रोजी भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळला गेला होता. या सामन्यात विविध समस्यांचा सामना करायला लागला होता.
भारत आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात अनेक प्रकारच्या अडचणी समोर आल्या होत्या. सामना दरम्यान मैदानात एक साप मैदानात घुसला होता. यामुळे सुमारे १० मिनिटे खेळ थांबवावा लागला. या सामन्यात काही काळ फ्लडलाइट बंद झाली होती. तसेच या वीजपुरवठा खंडित झाल्याने सामनाही खंडित झाला होता. मात्र आता अशी कोणतीही अडचण येणार नसल्याचे एसीएने स्पष्ट केले आहे. सर्व फ्लडलाइट्समध्ये एलईडी बल्ब लावण्यात आल्याचे त्यांनी सांगितले आहे. यासोबतच जमिनीच्या आजूबाजूला केमिकलची फवारणीही करण्यात आली आहे.
आसाम क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष तरंग गोगोई यांनी सापाच्या बाबतीत सांगितले की, 'फक्त मैदानातच नाही तर संपूर्ण स्टेडियममध्ये सापांच्या प्रवेशावर नियंत्रण ठेवण्यासाठी आम्ही पाऊल उचलले आहे. स्टँडमध्येही ही व्यवस्था करण्यात आली आहे. सापांना दूर ठेवता यावे यासाठी स्टँडसह संपूर्ण स्टेडियममध्ये केमिकल फवारण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"