Join us  

ऐतिहासिक! आशिया चषकात आता 'नेपाळ'ची एन्ट्री; भारत-पाकिस्तानच्या गटात खेळणार

asia cup 2023 : नेपाळच्या क्रिकेट संघाने यूएईच्या संघाला पराभूत करून ऐतिहासिक कामगिरी केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2023 12:27 PM

Open in App

नवी दिल्ली : नेपाळच्या क्रिकेट संघाने यूएईच्या संघाला पराभूत करून ऐतिहासिक कामगिरी केली आहे. कारण इतिहासात प्रथमच आता नेपाळचा संघ आशिया चषकाच्या स्पर्धेत खेळणार आहे. काठमांडू येथे काल झालेल्या सामन्यात नेपाळने यूएईला पराभवाची धूळ चारली. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना यूएईचा संघ ३३.१ षटकांत केवळ ११७ धावांवर सर्वबाद झाला. सोप्या आव्हानाचा पाठलाग करताना नेपाळच्या संघाने सांघिक खेळी करून विजय साकारला.

दरम्यान, नेपाळने ३०.३ षटकांत ३ गडी गमावून लक्ष्य गाठले. लक्षणीय बाब म्हणजे आशिया चषकासाठी नेपाळचा संघ भारत-पाकिस्तान यांच्या गटात असणार आहे. पाकिस्तानमध्ये आशिया चषक २०२३चा थरार रंगणार आहे. पण सुरक्षेच्या कारणास्तव भारतीय संघ पाकिस्तानात जाणार नसल्याचे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे. त्यामुळे भारताचे सामने तटस्थ ठिकाणी होणार आहेत.

खरं तर आशिया चषकाच्या यजमानपदावरून बीसीसीआय आणि पीसीबी यांच्यात वाद रंगला होता. आम्ही पाकिस्तानात जाणार नसल्याचे बीसीसीआयने म्हटले होते. तर भारतात होणाऱ्या विश्वचषकावर आम्ही बहिष्कार टाकू अशी धमकी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे तत्कालीन अध्यक्ष रमीझ राजा यांनी दिली होती. पण अलीकडेच नजम सेठी यांनी पत्रकार परिषदे घेऊन वादावर तोडगा काढला.

सप्टेंबरमध्ये रंगणार थरार "पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने भारताला त्यांचे आशिया चषकातील सामने तटस्थ ठिकाणी खेळावेत, तर पाकिस्तान आणि इतर संघ पाकिस्तानमध्ये खेळतील असा प्रस्ताव दिला आहे.  हा प्रस्ताव आशियाई क्रिकेट परिषदेकडे पाठवण्यात आला आहे. बीसीसीआयने सुरक्षेच्या कारणास्तव स्पर्धा तटस्थ ठिकाणी हलवण्याची मागणी केली होती. पाकिस्तानने आशिया चषकाचे सामने घरच्या मैदानावर आणि भारताचे सामने तटस्थ ठिकाणी खेळवण्याचा निर्णय घेतला आहे आणि आशियाई क्रिकेट परिषदेकडे आमचा हा प्रस्ताव आहे", असे पाकिस्तान बोर्डाचे अध्यक्ष नजम सेठी यांनी म्हटले आहे. आशिया चषकात एकूण संघ सहभागी होणार आहेत. २ ते १७ सप्टेंबर यादरम्यान ही स्पर्धा खेळवली जाईल. स्पर्धेचे सुधारित वेळापत्रक अद्याप समोर आले नाही. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :एशिया कप 2022नेपाळभारत विरुद्ध पाकिस्तानबीसीसीआयआंतरराष्ट्रीय क्रिकेट
Open in App