Nepal Cricketer Sandeep Lamichhane Rape Case: नेपाळचा स्टार क्रिकेटर ( Nepal Cricketer ) संदीप लामिछाने याच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप करणाऱ्या पिडीतेने नुकताच एक धक्कादायक खुलासा केला आहे. तिने केलेल्या नव्या दाव्यानंतर क्रिकेटवर्तुळात या प्रकरणाची जोरदार चर्चा रंगली आहे. दोन वर्षांपूर्वी एका तरुणीने संदीप लामिछाने याच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. त्यामुळे त्याची क्रिकेट कारकिर्दीवर बराच नकारात्मक परिणाम झाला. पण आता या प्रकरणात एक धक्कादायक अशी नवी माहिती समोर आली आहे.
काय केला खुलासा?
संदीप लामिछानेच्या विरोधात आरोप करणाऱ्या पिडीतेने आता वेगळीच कहाणी सांगितली आहे. "संदीप लामिछाने याने त्यावेळी लैंगिक शोषणाचा कुठलाही प्रयत्न केलेला नव्हता. काही लोकांनी आणि संघटनांनी मला संदीपवर असे आरोप करण्यास भाग पाडले. मी असे कुठलेही आरोप करणार नव्हते," असा धक्कादायक खुलासा पिडीतेने केला आहे.
८ वर्षांचा कारावास, ५ लाखांची नुकसान भरपाई
१८ वर्षीय तरुणीने २०२२ साली संदीप लामिछाने लैंगिक शोषण आणि बलात्काराचे आरोप केले होते. संदीपला नेपाळ संघाचे कर्णधार बनवण्यात आल्यानंतर हा आरोप करण्यात आला होता. काठमांडूच्या एका हॉटेलमध्ये लैंगिक शोषणाचा प्रकार घडल्याचा दावा त्या तरुणीने केला होता. काठमांडू जिल्हा न्यायालयाने या प्रकरणात संदीप लामिछाने याला दोषी ठरवले होते आणि आठ वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली होती. पण नंतर संदीपने पाटन उच्च न्यायालयात या शिक्षेला आव्हान दिले, त्यावेळी उच्च न्यायालयाने त्याला दोषमुक्त केले होते.
नव्या माहितीने सर्वत्र खळबळ
पिडीतेने दिलेल्या नव्या माहितीमुळे क्रिकेटजगतात खळबळ माजली आहे. या प्रकरणात आतापर्यंत ही माहिती कधीही समोर आली नव्हती. त्यामुळे सारेच याची चर्चा करत आहेत. ज्यावेळी संदीप लामिछाने वर आरोप झाले होते, तेव्हापासूनच याबाबत तपास सुरु होता. या प्रकरणी संदीप स्वत:ला निर्दोष असल्याचे सांगत होता. तसेच, त्याच्या विरोधात जाणूनबुजून कट रचला जात असल्याची शक्यताही त्याने बोलून दाखवली होती.