Nepal vs Maldives T20Is ( Marathi News ) : नेपाळच्या पुरुष क्रिकेट संघाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये छाप पाडायला सुरुवात केलेली असताना महिला संघही मागे राहिलेला दिसत नाही. नेपाळच्या पुरुष संघाने आशिया चषक आणि राष्ट्रकुल स्पर्धेत जगाला दखल घ्यावी लागेल अशी कामगिरी केली. आज महिला क्रिकेट संघाने वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेकींग कामगिरी करून दाखवली. नेपाळ विरुद्ध मालदिव यांच्यातल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० सामन्यात रुबिना छेत्री व पुजा महातो ( Rubina Chhetry व Puja Mahato ) यांनी रेकॉर्ड ब्रेक खेळ केला.
नेपाळने प्रथम फलंदाजी करताना ४ बाद २२७ धावांचा डोंगर उभा केला. यात रुबिनाने ५९ चेंडूंत १० चौकार व ५ षटकारांसह नाबाद ११८ धावांची खेळी केली. नेपाळकडून ट्वेंटी-२० क्रिकेटमधील ती शतक झळकावणारी पहिली महिला क्रिकेटपटू ठरली. यापूर्वी २०२१ सीता राणा मगरने कतारविरुद्ध केलेली ८२ धावांची नाबाद खेळी ही नेपाळकडून सर्वोत्तमय वैयक्तिक खेळी होती. रुबिनासह पुजा महातोने १६६ धावांची विक्रमी भागीदारी केली. नेपाळकडून झालेली ही पहिलीच शतकी भागीदारी ठरली. पुजाने ३६ चेंडूंत ५ चौकार व १ षटकारासह नाबाद ५९ धावा केल्या.
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये चौथ्या किंवा त्या खालील क्रमांकासाठी सर्वोत्तम भागीदारीचा विक्रम आज नेपाळच्या पुजा व रुबिना यांच्या नावावर नोंदवला गेला. यापूर्वी हा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या केट ब्लॅकवेल व के रोत्टोनाऊ ( १४७* वि. इंग्लड, २००५) यांच्या नावावर होता. रुबिनाने महिला ट्वेंटी-२०त चौथ्या किंवा त्या खालील क्रमवारीत सर्वोत्तम वैयक्तिक खेळीचा विक्रमही नावावर केला. यापूर्वी कतारच्या आयशाने २०२२ मध्ये सौदी अरेबियाविरुद्ध नाबाद ११३ धावा केल्या होत्या. नेपाळच्या धावसंख्येचा पाठलाग करताना मालदिवचा संघ १३ धावांवर गडगडला. रुबिनाने ३, तर आस्मिना कर्मचारीने चार विकेट्स घेतल्या. नेपाळने २१४ धावांनी सामना जिंकला.