आशिया चषक स्पर्धेत प्रथमच खेळण्यासाठी पात्र ठरलेल्या नेपाळने ( Nepal Cricket) १० वर्षांनंतर ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत एन्ट्री घेतली आहे. मुलपानी क्रिकेट मैदानार पार पडलेल्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप आशियाई पात्रता स्पर्धेच्या उपांत्य फेरीत त्यांनी संयुक्त अरब अमिरातीवर ( UAE) दणदणीत विजय मिळवला आणि २०२४ मध्ये अमेरिका-वेस्ट इंडिज येथे होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कपची पात्रता निश्चित केली. भारतीय माँटी दास ( Monty Das ) यांनी मुख्य प्रशिक्षक म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर नेपाळच्या क्रिकेटमध्ये कमालीची सुधारणा झालेली पाहायला मिळतेय आणि आज निकाल हा त्याचेच फलित आहे.
ICC Mens T20I World Cup Asia Finals स्पर्धेच्या उपांत्य फेरीत नेपाळने ८ विकेट्स राखून यूएईवर विजय मिळवला. या स्पर्धेच्या फायनलमध्ये जाणारे दोन संघ ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी पात्र ठरणार आहेत आणि नेपाळने त्यापैकी एक स्थान पटकावले. प्रथम फलंदाजी करताना संयुक्त अरब अमिरातीने २० षटकांत ९ बाद १३४ धावा केल्या. यष्टिरक्षक-फलंदाज अरविंदने ६४ धावांची खेळी करून एकट्याने लढा दिला. कर्णधार मुहम्मद वसीम ( २६) याने हातभार लावला. नेपाळच्या कुशल मल्लाने ३, तर लामिछानेने दोन विकेट्स घेतल्या.
प्रत्युत्तरात, आसिफ शेखच्या नाबाद ६४ आणि कर्णधार रोहित पौडेलच्या नाबाद ३४ धावांच्या जोरावर नेपाळने १७.१ षटकांत २ बाद १३५ धावा करून विजय मिळवला. कुशल भुर्तेल ( ११) व गुलसन झा ( २२) यांना मोठी खेळी करता आली नाही. या स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य फेरीत ओमानने १० विकेट्सने बहरिनला हरवून वर्ल्ड कप स्पर्धेतील स्थान पक्के केले.