नेपाळच्या महिला क्रिकेटपटूनं सोमवारी ऐतिहासिक विक्रमाची नोंद केली. महिलांच्या दक्षिण आशियाई स्पर्धेत हा पराक्रम केला आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अशी कामगिरी कोणालाही जमलेली नाही. मालदिव आणि नेपाळ यांच्यात हा ट्वेंटी-20 सामना झाला आणि नेपाळनं 10 विकेटे्स आणि 115 चेंडू राखून हा सामना जिंकलाही. पण, या सामन्यात नेपाळच्या गोलंदाजाची कामगिरी लक्षणीय ठरली. आतापर्यंत पुरुष क्रिकेटपटूलाही अशी कामगिरी करता आलेली नाही.
प्रथम फलंदाजी करताना मालदिवचा संपूर्ण संघ 10.1 षटकांत अवघ्या 16 धावाच करू शकला. त्यांच्या एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही. हम्झा नियाझ (9) आणि हाफ्सा अब्दुल्लाह ( 4) यांनाच खातं उघडता आले. अन्य आठ फलंदाज भोपळाही फोडू शकले नाहीत. त्यांना तीन अतिरिक्त धावा मिळाल्या. नेपाळनं पाच चेंडूंत हे लक्ष्य पार केले. नेपाळच्या काजल श्रेष्ठानं 5 चेंडूंत 3 चौकार मारताना 13 धावा केल्या आणि चार अतिरिक्त धावा मिळाल्या.
या सामन्यात नेपाळच्या अंजली चांदनं 2.1 षटकांत 2 निर्धाव षटक टाकले आणि सहा विकेट्स घेतल्या. करुणा भंडारीनं 4 धावांच 2 विकेट्स घेतल्या. एकही धाव न देता सहा विकेट्स घेणारी अंजली ही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिलीच गोलंदाज ठरली. आतापर्यंत पुरुष व महिला क्रिकेटपटूंमध्ये अशी कामगिरी कोणालाही करता आलेली नाही.