सिडनी : टी-२० विश्वचषकात भारतीय संघाचा दुसरा सामना सिडनी येथे नेदरलॅंड्सविरूद्ध होणार आहे. या सामन्यापूर्वी नेदरलॅंड्सच्या संघाचा कर्णधार स्कॉट एडवर्ड्सने पत्रकार परिषदेत मोठे विधान केले आहे. राउंड फेरीत शानदार प्रदर्शन करून नेदरलॅंड्सच्या संघाने सुपर-१२ मध्ये प्रवेश मिळवला आहे. मला वाटत नाही की मोठ्या प्रमाणात लोक आमच्याकडून जिंकण्याची अपेक्षा करत आहेत, असे नेदरलॅंड्सच्या कर्णधाराने म्हटले. तरीदेखील आम्ही सर्वोत्कृष्ट क्रिकेट खेळू आणि हा सामना जिंकण्यासाठी आम्ही सर्वकाही करू पण त्या अर्थाने आमच्यावर कोणताही दबाव नाही असेही एडवर्ड्सने सांगितले.
दरम्यान, मोठ्या संघाविरूद्ध खेळणे विशेष असल्याचे एडवर्ड्सने म्हटले. "हो, हे खूप मोठे आहे. तुमचे नेहमीच विश्वचषक खेळण्याचे स्वप्न असते आणि ही स्पर्धा जगातील सर्वात मोठे व्यासपीठ आहे. विराट कोहलीने पाकिस्तानविरूद्ध केलेली खेळी शानदार होती. मला आशा आहे की विराट कोहली आमच्याविरुद्ध पाकिस्तानच्या अविस्मरणीय शोची पुनरावृत्ती करणार नाही." अशा शब्दांत नेदरलॅंड्सच्या कर्णधाराने विराट कोहलीच्या खेळीचे कौतुक करताना मिश्किल टिप्पणी केली.
विराटच्या खेळीवरून मिश्किल टिप्पणीखरं तर पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यात विराट कोहलीने एकतर्फी झुंज देऊन भारताला विजय मिळवून दिला. पाकिस्तानने दिलेल्या १६० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाची निराशाजनक सुरूवात झाली होती. भारताची सलामी जोडी पाकिस्तानच्या गोलंदाजीसमोर अपयशी ठरली. पॉवरप्लेमध्ये भारताचे ४ गडी माघारी परतले होते. तिथून हार्दिक पांड्या आणि किंग कोहली यांनी शानदार भागीदारी नोंदवली. विराटने ५३ चेंडूत ८२ धावांची नाबाद खेळी करून भारताला विजय मिळवून दिला.
किंग कोहलीची शानदार नाबाद खेळीपाकिस्तानविरूद्धच्या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करून भारतासमोर विजयासाठी १६० धावांचे लक्ष्य ठेवले होते. भारताची देखील सुरूवात निराशाजनक झाली होती. संघाच्या अवघ्या ३१ धावांवर ४ गडी बाद झाले होते. १८ चेंडूत विजयासाठी ४८ धावांची गरज असताना विराटने शानदार खेळी केली. अखेर हॅरीस रौफच्या १९व्या षटकात विराटने दोन खणखणीत षटकार खेचून १५ धावा जोडल्या. भारताला आता६ चेंडूंत १६ धावा हव्या होत्या. मोहम्मद नवाजच्या पहिल्याच चेंडूवर हार्दिकने उत्तुंग फटका मारला, परंतु बाबरने झेल टिपला. हार्दिक ३७ चेंडूंत ४० धावांवर बाद झाला. ३ चेंडूंत १३ धावा हव्या असताना विराटने खणखणीत षटकार खेचला अन् हाईटमुळे तो नो बॉल ठरवला गेला. आता ३ चेंडूंत ६ धावाच करायच्या होत्या. फ्री हिटचा चेंडू नवाजने वाईड टाकला. फ्री हिटवर चेंडू स्टम्पवर आदळून फाईन लेगला गेला, परंतु विराट व दिनेश कार्तिकने ३ धावा पळून काढल्या. पाकिस्तानचे खेळाडू प्रचंड नाराज दिसले. डेड बॉलची मागणी करू लागले. २ चेंडू २ धावा हव्या होत्या आणि कार्तिक स्ट्राईकवर होता. पण, कार्तिक स्टम्पिंग झाला. १ चेंडू २ धावा असे असताना अश्विन स्ट्राईकवर होता. नवाजने Wide टाकला अन् सामना बरोबरीत आला. अश्विनने विजयी चौकार मारला आणि भारताने ४ गडी राखून सामना जिंकला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"