नवी दिल्ली ।
झिम्बाव्वेच्या बुलावायो येथे आयसीसीच्या मेन्स टी-२० वर्ल्ड कप क्लालिफायर बी २०२२ (ICC Mens T20 World Cup Qualifier B 2022) आयोजन करण्यात आलं आहे. याच टूर्नामेंटमध्ये मंगळवारी १२ जुलै रोजी नेदरलॅंड आणि हॉंगकॉंग यांच्यात झालेला सामना फारच रंजक ठरला. या सामन्यात नेदरलॅंडच्या एका गोलंदाजाने आपल्या खेळीने कमाल करत सर्वांचे लक्ष वेधले. लोगन व्हॅन बीकने हॉंगकॉंगविरूद्धच्या सामन्यात टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात हॅट्रिक घेत आपल्या देशासाठी एक नवा इतिहास रचला आहे.
लोगन व्हॅन बीकने रचला इतिहासलोगन व्हॅन बीक नेदरलॅंडचा पहिला असा गोलंदाज ठरला आहे, ज्याने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हॅट्रिक घेतली आहे. ही हॅट्रिक घेताना व्हॅन बीकने हॉंगकॉंग संघाचा कर्णधार निझाकत खान, विकेटकिपर स्कॉट मॅचिन आणि एहसान खान यांना तंबूत पाठवले. निझाकत झेलबाद झाला, तर इतर दोन फलंदाजांना बीकने एलबीडब्ल्यू करून माघारी पाठवले.
दरम्यान, लोगन व्हॅक बीकने १८ व्या षटकातील तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या चेंडूवर बळी पटकावून आपली हॅट्रिक पूर्ण केली. या सामन्यात त्याने ४ षटकं गोलंदाजी केली, ज्यामध्ये २७ धावा देऊन ४ बळी आपल्या नावावर केले. लोगन व्हॅक बीकनेच्या आक्रमक गोलंदाजीच्या जोरावर नेदरलॅंडच्या संघाने ७ बळी राखून सामना आपल्या नावे केला. याच्या पश्चात हॉंगकॉंगचा संघ केवळ ११६ धावा करू शकला आणि ११७ धावांचे लक्ष्य नेदरलॅंड्सने १३.२ षटकात ३ गडी गमावून पूर्ण केले.