नवी दिल्ली : फिक्सिंगसाठी खेळाडूंसोबत सातत्याने संपर्क करणाऱ्या किमान आठ जणांची नावे मी भारत सरकार किंवा भारतीय पोलिसांकडे सोपवू शकतो, असा दावा आयसीसीच्या एसीयूचे तपास समन्वयक स्टीव्ह रिचर्डसन यांनी केला आहे.
भारतात मॅच फिक्सिंगचा समावेश गुन्हेगारी कायद्याच्या कक्षेत आणण्याची सूचना आंतरराष्टÑीय क्रिकेट परिषदेच्या भ्रष्टाचार विरोधी युनिटने(एसीयू) केली आहे. कठोर कायदा नसल्यामुळे पोलीस कारवाईलादेखील मर्यादा येतात. अशावेळी फिक्सिंगला गुन्ह्याच्या कक्षेत आणणे हे सर्वांत प्रभावी शस्त्र ठरणार आहे. भारतात मॅच फिक्सिंगला गुन्हा घोषित करण्याची शिफारस गेल्या अनेक वर्षांपासून विधिज्ञ करीत आहेत. क्रिकेटमधील भ्रष्ट प्रकरणाचा तपास करताना संबंधित अधिकाऱ्यांच्या अधिकारावर मर्यादा येतात, असे या तज्ज्ञांचे मत आहे.
आयसीसीच्या एसीयूचे तपास समन्वयक स्टीव्ह रिचर्डसन यांनी ईएसपीएन क्रिकइन्फोशी बोलताना सांगितले की,भारतात फिक्सिंगविरोधी कुठलाही कायदा अस्तित्वात नाही. आमचे भारताच्या पोलिसांसोबत सलोख्याचे संबंध आहेत, मात्र त्यांच्याही काही मर्यादा आहेत. भ्रष्टाचाºयांचे प्रयत्न अपयशी ठरविण्यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करू, मात्र कायद्यातील उणिवांमुळे भारतीय पोलीसदेखील हतबल होतात, हे सत्य आहे. भारतात कायदा झाल्यास परिस्थिती बदलेल. सद्यस्थितीत ५० प्रकरणांचा तपास सुरू असून यातील अनेक तपास भारताशी संबंधित आहेत.
भारताने फिक्सिंगविरोधी कायदा पारित केल्यास खेळाला सुरक्षित ठेवण्यासाठी सर्वात प्रभावी पाऊल ठरणार आहे.
‘भारतात फिक्सिंगला गुन्हा घोषित करण्याची गरज आहे का’, या विषयावरील चर्चेत रिचर्डसन हे बीसीसीआयचे एसीयू प्रमुख अजितसिंग यांच्यासोबत सहभागी झाले होते. हा कायदा तयार झाल्यास खेळाडूंऐवजी फिक्सिंगमधून कोट्यवधींची उलाढाल करणाºया आणि ताठ मानेने समाजात वावरत असलेल्यांचे चेहरे उघड करणे सोपे होणार आहे, असे सांगून रिचर्डसन पुढे म्हणाले, ‘फिक्सिंगसाठी खेळाडूंसोबत सातत्याने संपर्क करणाºया किमान आठ जणांची नावे मी भारतीय पोलिसांकडे सोपवू शकतो.’ भारतीय पोलीस सेवेचे माजी अधिकारी अजितसिंग यांनी फिक्सिंगसाठी सध्या कुठलाही कायदा अस्तित्वात नसल्याची कबुली दिली. मॅचफिक्सिंग कायद्यांतर्गत भ्रष्ट लोकांचा तपास करण्याची इच्छा अजितसिंग यांनी व्यक्त केली. (वृत्तसंस्था)
>‘भारताला आगामी तीन वर्षांत आयसीसीच्या दोन मोठ्या स्पर्धांचे यजमानपद (टी-२० विश्वचषक २०२१ आणि वन डे विश्वचषक २०२३) भूषवायचे आहे. अशावेळी भारत सरकारने फिक्सिंगविरोधी कायदा पारित करावा, असा आमचा आग्रह असेल. श्रीलंकेने २०१९ साली असा कायदा अस्तित्वात आणला असून फिक्सिंगविरुद्ध कायदा करणारा आशियातील पहिला देश होण्याचा मान मिळवला आहे.’
-स्टीव्ह रिचर्डसन,
समन्वयक, एसीयू आयसीसी
Web Title: Network of match fixers in India, claims ICC
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.