नवी दिल्ली : पुढील वर्षी आयोजित अनेक महत्त्वाच्या स्पर्धांवर नजर रोखून भारतीय महिला हॉकी संघाला मानसिकरीत्या भक्कम बनविण्यासाठी न्यूरोट्रॅकर कार्यक्रम राबविण्यावर भर दिला जात आहे. कोच हरेंद्रसिंग हे या तंत्राचा उपयोग करीत खेळाडूंची एकाग्रता वाढविण्यात व्यस्त आहेत.
अमेरिका आणि कॅनडात न्यूरोट्रॅक कार्यक्रम लोकप्रिय असून आॅलिम्पिक पदक विजेते, एनएफएल, एनबीए आणि ईपीएलमधील खेळाडू मानसिक तयारीसाठी या तंत्राचा आधार घेतात.भारतीय क्रीडा प्राधिकरणाने(साई)आॅक्टोबरमध्ये प्रायोगिक स्तरावर हे तंत्र शिबिरात आणले. शिबिरात भारतीय संघ १५ ते २० मिनिटे न्यूरोट्रॅकचे सत्र घेत आहे.
हरेंद्र म्हणाले,‘आम्ही दररोज या तंत्राचा शिबिरात वापर करीत आहोत. खेळाडूंची एकाग्रता वाढविण्यासाठी याचा वापर होतो. निकाल येतील तेव्हा याचा लाभ दिसेल पण शिबिरात खेळाडू एकाग्रतेवर अधिक फोकस करताना दिसतात.
कर्णधार राणी म्हणाली,‘पुढील वर्षी राष्टÑकुल क्रीडा स्पर्धा, आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी, आशियाड आणि विश्वकप अशा मोठ्या स्पर्धा आहेत. मोठ्या संघांविरुद्ध खेळताना मानसिक तयारीदेखील असायला हवी. चार- पाच खेळाडू दररोज न्यूरोट्रॅक सत्राला उपस्थित राहतात. याचे सकारात्मक परिणाम दिसू लागले आहेत.’
भारतीय महिला हॉकी संघाने २००२ च्या मॅनचेस्टर राष्टÑकुल स्पर्धेत सुवर्ण जिंकले होते. चार वर्षांनंतर मेलबोर्न येथे रौप्यावर समाधान मानावे लागले. तेव्हापासून पदकाची झोळी मात्र रिकामीच राहिली. यावेळी गोल्ड कोस्ट राष्टÑकुल स्पर्धेत भारताला पदक मिळेल, असा विश्वास हरेंद्र आणि राणी यांनी व्यक्त केला. राणी पुढे म्हणाली,‘ आम्ही राष्टÑकुलमध्ये पदक जिंकण्याच्या निर्धाराने तयारी करीत आहोत. यंदा जपानमध्ये जपान आणि चीनसारख्या संघांना नमवून आशिया चषक जिंकून क्षमता सिद्ध केली. या विजेतेपदाचा लाभ पुढील स्पर्धांमध्ये होईल.’ तसेच, ‘राष्टÑकुलचे सुवर्ण हे आमचे लक्ष्य आहे. त्यानंतर आशियाई स्पर्धा जिंकून आॅलिम्पिक पात्रता गाठायची आहे. त्यासाठी कुठल्याही संघाला नमविण्याची मानसिक तयारी सुरू असल्याचे हरेंद्र म्हणाले.
Web Title: 'Neurotrocker' to increase the integrity of players; Use of women's hockey team, emphasis on developing mental stability
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.