भारतीय संघाला वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला आणि आणखी एका आयसीसी स्पर्धेत भारताला जेतेपदाशिवाय परतावे लागले. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ १२ वर्षांचा वन डे वर्ल्ड कप जिंकण्याचा दुष्काळ संपवेल असे वाटले होते, परंतु सलग १० सामन्यांतील अपराजित मालिकात ११व्या सामन्यात खंडीत झाली आणि वर्ल्ड कपची ट्रॉफी हातात येता येता राहिली. या स्पर्धेत फिरकीपटू आर अश्विनला ( R Ashwin) १ सामनाच खेळण्याची संधी मिळाली. चेपॉकवरील लढतीत त्याला संधी मिळाली आणि त्यानंतर तो बाकावरच दिसला. एक सामना खेळून वर्ल्ड कप स्पर्धेचा प्रवास संपेल, असा विचारही केला नव्हता, असे मत अश्विनने व्यक्त केले.
एकाच सामन्यात संधी का मिळाल्यामागचं कारणही अश्विनने त्याच्या यू ट्युब चॅनेलवर सांगितले. तो म्हणाला, चेन्नईतील एमए चिंदबरम स्टेडियमवर जे माझं घरचं मैदान आहे. तिथे वर्ल्ड कप स्पर्धेत खेळण्याची मिळालेली संधी शेवटची ठरेल असे वाटले नव्हते. धर्मशाला येथील न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात खेळण्याची संधी मिळेल, असे वाटत होते. मी चांगली गोलंदाजी करत होतो.
हार्दिक पांड्याला दुखापत झाली आणि धर्मशाला येथील न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात संधी मिळेल, असे मला वाटले होते. हार्दिक हा संघातील प्रमुख खेळाडू होता, कारण त्याच्या जागी खेळेल असा अतिरिक्त अष्टपैलू खेळाडू आमच्याकडे नव्हता, असेही अश्विनने सांगितले.
रोहित शर्मा व राहुल द्रविड यांनी वर्ल्ड कपच्या तयारीसाठी सर्व रणनीती तयार केली होती आणि टीम इंडिया वेगळ्याच प्रकारचं क्रिकेट खेळला, असेही तो म्हणाला. अश्विनला वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या फायनलमध्ये संधी मिळेल असे वाटले होते, परंतु भारताने विजयी संघात बदल न करण्याचा निर्णय घेतला.
गावस्करांचा संतापआर अश्विनला संधी न मिळाल्याने सुनील गावस्कर संतापले होते. म्हणाले की, पुन्हा एकदा अश्विनला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर बसवले गेले, मला कळत नाही की त्याने कोणती चूक केली आहे. संघाबाहेर होणे हे अश्विनला आता सवईचे झालेय.