मुंबई : ऑस्ट्रेलिया संघाने 0-2 अशा पिछाडीवरून दमदार कमबॅक करताना पाच सामन्यांची वन डे मालिका 3-2नं खिशात घातली. ऑस्ट्रेलियाने यजमान भारताला सलग तीन सामन्यांत पराभवाची चव चाखवत 2009 नंतर प्रथमच भारतात वन डे मालिका जिंकली. वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वीच्या अखेरच्या वन डे मालिकेतील पराभवामुळे भारतीय चाहते चक्रावले आहेत. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ प्रथमच मायदेशात हरला. भारताच्या या पराभवामागे अनेक कारणं आहेत आणि त्यापैकी एक म्हणजे अनुभवी खेळाडू महेंद्रसिंग धोनीची अनुपस्थिती. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकेल क्लार्क यानेही धोनीची अनुपस्थिती भारतीय संघाच्या पथ्यावर पडल्याची कबुली दिली आहे.
ऑस्ट्रेलियाने विजयासाठी ठेवलेल्या 273 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताचा सलामीवीर शिखर धवन स्वस्तात बाद झाला. रोहित शर्मानं ( 56) अर्धशतकी खेळी करताना कर्णधार कोहलीसह 53 धावांची भागीदारी केली. मात्र, भारताच्या मधल्या फळीनं सपशेल निराश केले. रिषभ पंत, विजय शंकर आणि रवींद्र जडेजा यांना अपयश आहे. मात्र, जाधव आणि भुवनेश्वर यांनी भारताच्या विजयाच्या आशा पल्लवीत केल्या. या दोघांनी ऑसी गोलंदाजांचा धैर्याने सामना केला. जाधवने 44 आणि भुवीने 46 धावा करताना सातव्या विकेटसाठी 91 धावांची भागीदारी केली. पण, त्यांचे प्रयत्न अयशस्वी ठरले.
भारतीय संघाला मधल्या फळीत भक्कम पर्यायाची गरज असल्याचे पुन्हा एकदा जाणवले. सोशल मीडियावर अनेकांनी 2011च्या वर्ल्ड कपची आठवण करून देताना युवराज सिंग आणि धोनीच्या जोडीचे कौतुक केले. अशाच एका ट्विटला उत्तर देताना क्लार्कने धोनीचे महत्त्व सांगितले. 37 वर्षीय धोनी आगामी वर्ल्ड कप स्पर्धेत मधल्या फळीत सक्षम पर्याय ठरू शकतो, असे तो म्हणाला. ''धोनीला कमी लेखण्याची चूक करू नका. मधल्या फळीत खेळण्याचा त्याचा अनुभव भारतीय संघाच्या कामी येणारा आहे,'' असे क्लार्कने उत्तर दिले.