Crime News : खोटी माहिती देत अनेकांना गंडा घालणाऱ्या माजी क्रिकेटरला नवी दिल्लीतील चाणक्यपुरी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मृणांक सिंह असं आरोपीचं नाव असून तो हरिणाकडून अंडर-१९ क्रिकेट खेळला आहे. जुलै २०२२ मध्ये मृणांक सिंह याने ताज पॅलेस हॉटेलची ५ लाख ५३ हजार रुपयांची फसवणूक केली होती. मी मुंबई इंडियन्स संघाकडून खेळत असल्याचा दावा तेव्हा मृणांक सिंह याने केला होता. मृणांक सिंह याच्याकडून फसवणूक झालेल्या व्यक्तींमध्ये भारताचा स्टार क्रिकेटपटू ऋषभ पंत याचाही समावेश आहे. पंत याची तब्बल १ कोटी ६३ लाख रुपयांची फसवणूक झाली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, मृणांक सिंह याने हॉटेल, बार, रेस्टॉरंट, कॅब ड्रायव्हरसह काही तरुणींचीही फसवणूक केली आहे. तो अनेक तरुणी आणि मॉडेल्सच्याही संपर्कात असल्याचं त्याच्या मोबाईलच्या तपासणीदरम्यान आढळून आलं आहे. मोबाईलमध्ये त्याचे अनेक आक्षेपार्ह फोटोही आढळले आहेत. दिल्ली पोलिसांनी मृणांक सिंह याला अटक केल्यानंतर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
ताज पॅलेस हॉटेलची कशी केली फसवणूक?
कर्नाटकातील एक वरिष्ठ आयपीएस अधिकारी असल्याचं सांगत मृणांक सिंह हा आलिशान हॉटेल्समध्ये राहत असत. २०२२ मध्ये २२ जुलै ते २९ जुलै यादरम्यान तो ताज पॅलेस हॉटेलमध्ये राहत होता. मात्र हॉटेलचे ५ लाख ५३ हजार ३६२ रुपयांचे बिल न देताच सिंह याने तेथून धूम ठोकली. त्यानंतर हॉटेलकडून त्याला संपर्क करत अनेकदा पैसे भरण्याबाबत विनंती करण्यात आली. मात्र तो सतत काही ना काही कारणं सांगत वेळ मारून नेत होता. अखेर २२ ऑगस्ट रोजी ताज पॅलेस हॉटेलकडून नवी दिल्लीतील चाणक्यपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती.
दरम्यान, मृणांक सिंह याने आतापर्यंत अनेक लोकांची फसवणूक केली असून त्याच्या चौकशीदरम्यान नवी माहिती समोर येण्याची शक्यता आहे.