मुंबई : आयपीएल २०२४ साठी मुंबई इंडियन्समध्ये असलेले नवे चेहरे स्वत:ची प्रतिभा सिद्ध करतील, असा विश्वास संघाचा माजी कर्णधार रोहित शर्मा याने व्यक्त केला. मुंबई संघाचे लक्ष्य हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात सहावे जेतेपद असल्याचा निर्धारदेखील रोहितने व्यक्त केला.पाचवेळेचा चॅम्पियन मुंबईने यंदा दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज गेरॉल्ड कोएत्झी, १९ वर्षांखालील विश्वचषकातील अनकॅप्ड स्टार क्वेना मफाका, इंग्लंडचा ल्यूक वुड, श्रीलंकेचा नुवान तुषारा, वेस्ट इंडीजचा रोमारियो शेफर्ड आणि अफगाणिस्तानचा मोहम्मद नबी यांना संघात सहभागी करून घेतले.
भारताचा युवा खेळाडू श्रेयस गोपाल हादेखील याच संघात आहे. या खेळाडूंनी स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर चांगली कामगिरी केली आहे. हे सर्वजण सुरुवातीपासून स्वत:च्या कामगिरीची अमिट छाप उमटवतील, अशी आशा आहे. रोहित स्वत: सोमवारी शिबिरात दाखल झाला होता. तो पुढे म्हणाला, ‘माझ्यासाठी सराव आणि तयारी नेहमीसाठी प्रथम पसंती आहे.
याद्वारे कुठल्याही सामन्यात खेळण्यासाठी आत्मविश्वास प्राप्त करू शकतो. सामन्याआधी अनेक गोष्टी आत्मसात करतो. त्याचा लाभ खेळताना निश्चितपणे होत असतो. काही गोष्टी करायच्यादेखील आहेत. त्या गोष्टी आता पूर्ण करणार आहे.’ रोहितने आयपीएलआधी इंग्लंडविरुद्धची पाच सामन्यांची कसोटी मालिका ४-१ अशी जिंकून दिली होती.