India vs Australia, 4th Test Day 5 : भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी मालिका जिंकून इतिहास रचला आहे. दुखापतींवर मात करत अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखालील नव्या दमाच्या भारतीय संघाने कांगारुंना चितपट करुन मिळवलेल्या विजयाचं सर्वांकडून कौतुक होत आहे.
ऋषभ पंतने ब्रिस्बेन कसोटीत पाचव्या दिवशी ९६ व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर खणखणीत चौकार खेचला आणि भारताने कसोटी जिंकली. भारताच्या या ऐतिहासिक विजयाचं माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागनं त्याच्या हटके शैलीत टीम इंडियाचं अभिनंदन केलंय.
"खूशी के मारे पागल. ये नया इंडिया है. घर मै घुसकर मारता है. अॅडलेड कसोटीनंतर ते आज भारताच्या युवा खेळाडूंनी सर्वांना आनंद दिलाय. आपण विश्वचषक याआधी जिंकलाय, पण आजचा विजय खूप महत्वाचाय आणि हो, पंतमुळे हा विजय जास्त महत्वाचा ठरलाय", असं ट्विट वीरेंद्र सेहवागनं केलं आहे. विशेष म्हणजे, हे ट्विट करताना सेहवागनं एका ट्रकचा फोटो ट्विट केलाय. या ट्रकच्या मागच्या बाजूस "ये नया भारत है, घर में घुसकर मारता है", असं लिहिलंय. त्यामुळे सेहवागचं हे ट्विट चांगलंच व्हायरल होतंय.
प्रत्येक सेशनमध्ये नवा हिरो मिळालाय- सचिनमास्टर ब्लास्टर सचिननेही भारतीय संघांचे तोंड भरुन कौतूक केलंय. भारताच्या विजयी क्षणाचा फोटो ट्विट करत सचिनने संपूर्ण टीमचं कौतुक केलंय. "प्रत्येक सेशनमध्ये आपल्याला नवा हिरो पाहायला मिळालाय. जेव्हा आपल्याला दुखापतींना सामोरं जावं लागलं. तेव्हा आपण आणखी खंबीरपणे उभं राहिलो. स्वत:च्या सीमांना ओलांडून निष्काळजीपणे नव्हे, तर निर्भयतेने क्रिकेट खेळलो. दुखापती आणि अनिश्चिततेचा सामना अतिशय संयम व आत्मविश्वासाने केला. आतापर्यंतच्या सर्वात उत्कृष्ट मालिका विजयांपैकी हा एक विजय आहे. भारतीय संघाचे अभिनंदन", असं ट्विट सचिननं केलं आहे.