नवी दिल्ली : श्रीलंका दौऱ्यावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची प्रतीक्षा करत असलेले देवदत्त पडिक्कल, नितिश राणा आणि चेतन सकारिया हे खेळाडू, व्यक्ती आणि प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविड यांच्याकडून शिकण्यास आतुर आहेत. १८ जुलैपासून सुरू होणाऱ्या श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतून अनेक खेळाडू आंतरराष्ट्रीय पदार्पण करतील. शिखर धवनच्या नेतृत्वाखालील हा संघ भारताचा दुसरा संघ असून, मुख्य संघ विराट कोहलीच्या नेतृत्वात इंग्लंड दौऱ्यावर व्यस्त आहे.
या मालिकेत तब्बल सहा खेळाडूंना आंतरराष्ट्रीय पदार्पणाची संधी मिळू शकते. पडिक्कलने एका कार्यक्रमादरम्यान सांगितले की, ‘राहुल द्रविड हे प्रशिक्षक म्हणून उपलब्ध होणे खूप मोठी गोष्ट असून, याहून अधिक तुम्ही दुसरं काही मागू शकत नाही. त्यांचासारखा मार्गदर्शक सोबत असणे एक शानदार अनुभव आहे. मी आशा करतो की, त्यांच्याकडून खूप काही शिकण्यास मिळेल.’
डावखुरा फलंदाज नितिश राणा म्हणाला, ‘मी ऐकले आहे की प्रशिक्षक म्हणून आणि खेळाडू म्हणून राहुल द्रविड सारखेच आहेत. त्यांच्यामध्ये जितके धैर्य आहे, त्यातील एक टक्का जरी मी आत्मसात करू शकलो, तर ते माझ्यासाठी खूप मोठे यश ठरेल.’ सौराष्ट्रचा चेतन साकारियाही द्रविड यांच्या मार्गदर्शनाखाली खेळण्यास उत्सुक आहे. तो म्हणाला, ‘ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडसारखे प्रतिस्पर्धी संघ जेव्हा दबदबा राखतात, तेव्हा द्रविड संघ खंबीरपणे कसे खेळायचे हे मला त्यांच्याकडून शिकायचे आहे. प्रतिस्पर्धी संघाला कशा प्रकारे ते अडचणीत आणायचे आणि स्वत:ला कसे समर्पित करायचे हे मला शिकायचे आहे. त्यांच्या विचारांची प्रक्रिया शिकून ती आत्मसात करायची आहे.’