नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाला इंग्लंडमधील कसोटी मालिकेत लाजीरवाणा पराभव पत्करावा लागला. भारतीय संघ नोव्हेंबर महिन्यात ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यावर जाण्यापूर्वी भारतीय संघात एक नवीन पाहुणा दाखल होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
इंग्लंडमधील पराभवानंतर बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीपुढे भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांना हजर व्हावे लागले. या पराभवाची कारणमीमांसा त्यांना करावी लागली. यानंतर आपल्याला ऑस्ट्रेलियामध्ये पराभवाचा सामना करावा लागू नये आणि पुन्हा एकदा आपली चौकशी होऊ नये, असे शास्त्री यांनी ठरवले आहे. त्यामुळेच संघात एक नवीन पाहुणा आणायचे त्यांनी ठरवले आहे.
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत मोईन अली आणि आदिल रशिद यांनी चांगला मारा केला होता. हे दोघे दादा फिरकीपटू नसेल तरी त्यांची कामगिरी मात्र नेत्रदीपक झाली होती. या दोघांना पाकिस्तानचा माजी फिरकीपटू साकलेन मुश्ताकने मार्गदर्शन केले होते.
भारतीय संघ व्यवस्थापनाने हे सारे पाहून एक निर्णय घेतला आहे. शास्त्री हे भारताचे मुख्य प्रशिक्षक आहेत. संजय बांगर हे फलंदाजी, भारत अरुण गोलंदाजी आणि आर. श्रीधर हे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आहे. पण भारतीय संघात फिरकी गोलंदाजीसाठी खास प्रशिक्षक नाही. येत्या काही दिवसांत भारतीय संघाबरोबर एक फिरकी गोलंदाजी प्रशिक्षक काम करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.