इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातल्या पाच कसोटी सामन्यांच्या पतौडी चषक मालिकेला 4 ऑगस्टपासून सुरूवात होणार आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचे ( second cycle of the World Test Championship) दुसरे पर्वही याच मालिकेपासून सुरू होत आहे. ऑगस्ट 2021 ते जून 2023 या कालावधीत WTC स्पर्धेचे दुसरे पर्व होणार असून यात भारत-इंग्लंड आणि अॅशेस या दोन मालिका पाच सामन्यांच्या आहेत. पण, WTC च्या दुसऱ्या पर्वातील गुण पद्धतीत बदल करण्याचा विचार सुरू झाला आहे. त्यामुळे आता फायनल पर्यंतचा प्रवास अधिक रंजक होणार आहे.
ऑस्ट्रेलियाचा संघ पुढील वर्षी भारत दौऱ्यावर आहे आणि तेथे चार सामन्यांची मालिका खेळणार आहे. याव्यतिरिक्त तीन सामन्यांच्या सात मालिका आणि दोन सामन्यांच्या 13 मालिका खेळवण्यात येणार आहेत. आयसीसीनं अद्याप फायनल कुठे खेळवली जाईल, हे निश्चित केलेले नाही. WTCच्या पहिल्या पर्वाप्रमाणे कसोटी खेळणारे नऊ संघ तीन होम व तीन अवे अशा सहा मालिका खेळतील.
या कालावधीत इंग्लंड सर्वाधिक 21 कसोटी सामने खेळणार आहेत. त्यानंतर भारत ( 19), ऑस्ट्रेलिया ( 18) आणि दक्षिण आफ्रिका ( 15) यांना सर्वाधिक कसोटी सामने खेळता येणार आहेत. WTCच्या पहिल्या पर्वातील विजेत्या न्यूझीलंडच्या वाट्याला 13 कसोटी सामने आहेत. त्याच्यासोबत वेस्ट इंडिज आणि श्रीलंका यांच्या वाट्याला 13 सामने आहेत. पाकिस्तान 14 सामने खेळणार आहेत, तर बांगलादेश 12 सामने खेळतील.
कशी असेल नवीन Points System
प्रत्येक संघाला समान कसोटी सामने मिळणार नसल्यामुळे गुणतालिकेतील तफावत टाळण्यासाठी आयसीसीनं प्रत्येक सामन्याला समान गुण देण्याचा विचार सुरू केला आहे. या प्रस्तावानुसार विजेत्या संघाला 12 गुण, सामना बरोबरीत सुटल्यास 6 गुण, तर निकाल अऩिर्णित लागल्यास प्रत्येकी 4 गुण दिले जातील. षटकांची गती संथ ठेवणाऱ्या संघाच्या गुणातून 1 गुण कमी करण्यात येईल.
आयसीसीचे CEO जॉफ अलार्डीस यांनी सांगितले की, प्रत्येक मालिकेला 120 गुण देण्यापेक्षा प्रत्येक सामन्याला समान गुण देण्याचा विचार आहे. त्यानुसार प्रत्येक सामन्याला 12 गुण दिले जातील. संघाच्या गुणानुसार त्याची टक्केवारी काढली जाईल आणि त्यानुसार त्यांचा गुणतालिकेतील क्रम ठरवला जाईल.
Web Title: A new points system has been proposed for the next WTC cycle, starting with the ENGvIND Tests
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.