Join us  

सिक्सर किंग युवीसह पोलार्ड पडला मागे; एका ओव्हरमध्ये ३९ धावांसह सेट झाला नवा वर्ल्ड रेकॉर्ड

भारताचा सिक्सर किंग युवराज सिंगसह पोलार्डचा वर्ल्ड रेकॉर्ड मागे पडला आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2024 10:01 AM

Open in App

आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये एका षटकात एकदा दोनदा नव्हे तर तब्बल ५ वेळा ३६ धावा झाल्याचे पाहायला मिळाले आहे. पण यावेळी हे सर्व विक्रम मोडीत निघाले आहेत. कारण एका बॅटरनं एका षटकात ३९ धावा कुटण्याचा नवा रेकॉर्ड सेट केलाय. यासह भारताचा सिक्सर किंग युवराज सिंगसह पोलार्डचा वर्ल्ड रेकॉर्ड मागे पडला आहे. 

याआधी फलंदाजांनी एका षटकात कुटल्या होत्या सर्वाधिक धावा

आतापर्यंत टी-२० क्रिकेटमध्ये भारताचा युवराज सिंग, वेस्ट इंडिजचा केरॉन पोलार्ड आणि निकोलस पूरन नेपाळचा दीपेंद्र सिंह ऐरी या फलंदाजांसह रोहित/ रिंकू सिंह या भारतीय जोडीनं  एका ओव्हरमध्ये सर्वाधिक धावांचा रेकॉर्डची नोंदवल्याचे पाहायला मिळाले होते.. पण आता समोया संघाच्या डेरियस विसर याने एका दमात सर्वांना मागे टाकले आहे.  

सलग ६ षटकार न मारताही मागे पडला युवराज सिंगचा रेकॉर्ड

समोया (Samoa) चा फलंदाज डेरियस विसर याने वानुअतु (Vanuatu) विरुद्धच्या सामन्यात एका षटकात ३९ धावा कुटल्या. आता यात सलग ६ षटकारांचा समावेश नव्हता. पण या धावा एका षटकातच आल्या. नो बोलच्या रुपात ३ अवांतर चेंडू मिळाल्याचा फायदा उठवत या पठ्ठयानं एका षटकात सर्वाधिक धावा करण्याचा  विश्व विक्रम आपल्या नावे केला आहे. आतापर्यंत टी-२० क्रिकेटमध्ये एका षटकात कोणत्याही फलंदाजाने एवढ्या धावा काढल्याचे पाहायला मिळाले नव्हते.  

अशी प्रकारे एका षटकात मिळाल्या ३९ धावा

डेरियस विसर याने नालिन निपिको या गोलंदाजाविरुद्ध आक्रमक फटकेबाजी करत आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये नवा विक्रम सेट केला. या सामन्यात त्याने शतकी खेळीही केली. डेरियस विसर याने १५ वे षटक घेऊन आलेल्या वानुअतुच्या ताफ्यातील गोलंदाज नालिन निपिको याच्या गोलंदाजीवर पहिल्या ३ चेंडूत ३ षटकार खेचले. चौथा चेंडू नो बॉल होता. जो निर्धाव राहिला. पुढच्या चेंडूवर डेरियस विसरनं आणखी एक षटकार मारला. पाचवा चेंडू निर्धाव टाकल्यानंतर पुन्हा पुढच्या  चेंडूवर आणखी एक षटकार आला. हा चेंडू नो बॉल होता. या अवांतर चेंडूवर आणखी एक षटकार बसला. ६ षटकार आणि नो बॉलच्या अवांतर ३ धावांसह एका षटकात सर्वाधिक ३९ धावांचा विक्रम सेट झाल्याचे पाहायला मिळाले. क्रिकेटच्या मैदानात अनेक विक्रम सेट होत असतात. मॉडर्न क्रिकेट खूपच जलदगतीने पुढे सरकत आहे. त्यामुळे हा विक्रमही एखाद्या फलंदाजाने मोडला तर ते नवल वाटणार नाही. 

टॅग्स :टी-20 क्रिकेटयुवराज सिंगकिरॉन पोलार्ड