Join us  

Cricket New Rule: चेंडूला थुंकी लावण्यास बंदी, मांकडिंग ठरणार अधिकृत ‘धावबाद’

क्रिकेटने नियम बदलले : येत्या १ ऑक्टोबरपासून होणार अंमलबजावणी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2022 5:35 AM

Open in App

लंडन : क्रिकेटचे नियम ठरविण्याची जबाबदारी मेरिलबोन क्रिकेट क्लब अर्थात एमसीसीकडे आहे.  हा खेळ आणखी चुरशीचा तसेच पारदर्शी व्हावा म्हणून एमसीसीने  नियमात काही बदल केले आहेत. हे बदल येत्या १ ऑक्टोबरपासून लागू होणार आहेत.

 क्रिकेटमध्ये आता चेंडूला थुंकी लावण्यास बंदी, तसेच मांकडिंगचा ‘धावबाद’ नियम बदलण्यात आला आहे. नॉन स्ट्रायकरवर उभा असलेला फलंदाज क्रीजबाहेर निघाल्यास त्याला बाद करण्याची कृती आता नियमबाह्य असणार नाही. क्रीजबाहेर निघणारा फलंदाज यापुढे धावबाद मानला जाईल. चेंडूवर थुंकीचा वापर करणेही पूर्णपणे बंद करण्यात आला आहे.

  • कोरोनामुळे चेंडूला थुंकी लावण्यास मनाई करण्यात आली होती. आता मात्र चेंडूला थुंकी लावण्यास कायस्वरूपी बंदी घालण्यात आली आहे. त्याऐवजी चेंडू गुळगुळीत करण्यासाठी घाम लावता येईल.
  • नव्या नियमानुसार आता कोणताही फलंदाज झेलबाद झाला, तर नव्या खेळाडूला फलंदाजीसाठी (स्ट्रायकर) उतरावे लागेल. झेलबाद होताना फलंदाज एकमेकांची जागा घेत असतात. जागा बदल झाली तर नवा खेळाडू नॉन स्ट्रायकर म्हणून धावपट्टीवर उतरत असे. मात्र आता नव्या फलंदाजाला स्ट्रायकर म्हणूनच खेळपट्टीवर उतरावे लागेल.
  • चेंडू टाकल्यानंतर मैदानावर एखादी व्यक्ती आली किंवा प्राणी आला तर ‘डेडबॉल’ घोषित केला जाईल. याआधी असा अडथळा आला तरी खेळ सुरूच ठेवला जायचा.
  • एखादा खेळाडू चुकीच्या पद्धतीने उभा राहिल्यास किंवा त्याने चुकीची हालचाल केल्यास त्यादरम्यानचा चेंडू डेडबॉल घोषित केला जायचा. मात्र आता खेळाडूकडून अशा प्रकारची चूक झाल्यास फलंदाजी करणाऱ्या संघाला ५ गुण बोनस दिले जातील. याआधी डेडबॉल घोषित केल्यानंतर त्या चेंडूदरम्यान फलंदाजी करणाऱ्या टीमच्या धावा गृहित धरल्या जात नव्हत्या. त्यामळे फलंदाजी करणाऱ्या संघाला याचे नुकसान व्हायचे.
  • कोणताही चेंडू खेळपट्टीच्या बाहेर जाताना फटका मारताना फलंदाजाचा किंवा बॅटचा भाग खेळपट्टीत राहणे गरजेचे आहे. तसे नाही झाले तर डेड बॉल घोषित करण्यात येईल. तसेच कोणताही चेंडू खेळण्यासाठी फलंदाजाला खेळपट्टीच्या बाहेर जावे लागत असेल तर तोदेखील ‘डेड बॉल’ घोषित केला जाईल.
  • एखादा चेंडू खेळताना फलंदाजाने आपली जागा तसेच स्थिती बदलली तर फलंदाजाच्या जागेनुसारच तो चेंडू वाईड आहे की नाही हे ठरवले जाईल. स्टम्पपासूनच्या लांबीनुसार चेंडू वाईड ठरवला जाणार नाही.
  • क्रिकेटमध्ये मांकडिंगला ‘अनफेअर प्ले’चा दर्जा होता. चेंडू टाकताना नॉनस्ट्राईकर फलंदाज क्रीजमधून बाहेर पडत असेल आणि गोलंदाजाने चेंडूने यष्टी उडविल्या तर   त्याला ‘मांकडिंग’ म्हटले जायचे. आता अशा पद्धतीने गोलंदाजाने नॉनन्स्ट्राईकर फलंदाजाला बाद केले तर त्याला अधिकृतरीत्या धावबाद समजले जाईल.
  • जर गोलंदाजाने चेंडू फेकण्यापूर्वी स्ट्राइकवर असलेल्या फलंदाजाला धावबाद करण्यासाठी चेंडू फेकला, तर तो चेंडू 'डेडबॉल' घोषित करण्यात येईल. क्रिकेटमध्ये ही अत्यंत दुर्मिळ घटना असून अशा प्रसंगी पंचाकडून 'नो बॉल'चा निर्णय दिला जात होता.  
  • बदली खेळाडूच्याबाबतीतही एमसीसीने नवा नियम लागू केला आहे. नव्या नियमानुसार सामन्यातील बदली खेळाडू हा नियमित खेळाडूप्रमाणे खेळविण्यात येईल. 
Open in App