भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू निवृत्त होऊन सहा वर्षांहून अधिक काळ झाला. पण, क्रिकेट चाहत्यांमध्ये त्यानं निर्माण केलेलं स्थान आजही तसेच कायम आहे. तेंडुलकरनं भारतातील चाहत्यांना क्रिकेटच्या प्रेमात पाडलं. या प्रेमाचे अनेक दाखले क्रिकेटच्या इतिहासात लिहिले आणि आजही दिले जात आहेत. यात आणखी एका चाहत्याची भर पडली आहे.
कोळ्यांच्या ( Spider ) विविध प्रजातीवर पीएचडी करणाऱ्या एका संशोधकानं तेंडुलकर प्रती आपले प्रेम व्यक्त केले आहे. त्यानं कोळ्याची एक नवीन प्रजाती शोधून काढली आहे आणि तिला त्यानं सचिनचं नाव दिले आहे. गुजरात एज्युकेशन एंड रिसर्च फाऊंडेशनमधील ज्युनियर रिसर्चर ध्रुव प्रजापतीनं कोळ्यांची काही नवीन प्रजाती शोधल्या आहेत. त्यापैकी एका प्रजातीला त्यानं तेंडुलकरचं, तर दुसऱ्या प्रजातीला संत कुरियकोस इलियास चावरा यांचं नाव दिले आहे. चावरा यांनी केरळमध्ये शिक्षणाचा प्रसार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावी होती.
मारेंगो सचिन तेंडुलकर (Marengo Sachin Tendulkar) ही प्रजाती केरळ, तामिळनाडू आणि गुजरात तेथे सापडते. ध्रुवनं 2015मध्ये मारेंगो प्रजातीचा शोध लावला होता. पण, त्यावर संशोधन आणि ओळख पटवण्याचं काम 2017मध्ये पूर्ण झाले. ध्रुवनं सांगितले की,''या दोन नवीन प्रजाती एशियन जंम्पिंग स्पायडर्समधील आहेत.''
तेंडुलकरनं 200 कसोटींत 15921 धावा केल्या आहेत. नाबाद 248 ही त्याची कसोटीतील सर्वोत्तम खेळी आहे आणि त्यानं 51 शतकं व 68 अर्धशतकं झळकावली आहेत. वन डे क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 463 सामन्यांत 18426 धावा आहेत. त्यात 49 शतकं व 96 अर्धशतकं आहेत.
भारताच्या 15 वर्षीय महिला क्रिकेटपटूनं मोडला सचिन तेंडुलकरचा मोठा विक्रम