बर्मिंगहॅम : यजमान इंग्लंडने यंदाचा विश्वचषक आमचाच असल्याच्या तोऱ्यात खेळताना गतविजेत्या ऑस्ट्रेलियाचा ८ गड्यांनी धुव्वा उडवत दिमाखात अंतिम फेरीत प्रवेश केला. आता पहिल्यांदाच विश्वविजेतेपद उंचावण्यासाठी त्यांना झुंजार न्यूझीलंडविरुद्ध भिडावे लागेल. विशेष म्हणजे या दोन्ही संघांनी एकदाही विश्वविजेतेपद पटकावलेले नसल्याने यंदा क्रिकेटविश्वाला नवा विश्वविजेता मिळणार हे नक्की.एकतर्फी झालेल्या उपांत्य सामन्यात प्रथम फलंदाजी करणाºया ऑस्ट्रेलियाला ४९ षटकात केवळ २२३ धावांत गुंडाळून इंग्लंडने अर्धी लढाई जिंकली. यानंतर फलंदाजांच्या जोरावर केवळ ३२.१ षटकात विजयी लक्ष्य पार करत इंग्लंडने आपले नाणे खणखणीत वाजवले. एकवेळ स्पर्धेबाहेर पडण्याच्या उंबरठ्यावर आलेल्या इंग्लंडने मोक्याच्यावेळी भारतासारख्या तगड्या संघाला धक्का दिला आणि त्यानंतर टॉप गियर टाकत उपांत्य फेरी गाठली होती. येथे त्यांना बलाढ्य ऑस्ट्रेलियाचे तगडे आव्हान होते. दखल घेण्याची बाब म्हणजे इंग्लंडच्या तुफानी खेळापुढे ऑस्ट्रेलियाला पहिल्यांदाच विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात पराभव पत्करावा लागला.
एजबस्टन स्टेडियमवर नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र खिस वोक्स (३/२०) आणि आदिल राशिद (३/५४) यांच्यापुढे कांगारुंची दाणदाण उडाली. कर्णधार अॅरोन फिंच (०), डेव्हिड वॉर्नर (९) व पीटर हँड्सकोम्ब (४) झटपट परतल्याने आॅस्टेÑलियाची ३ बाद १४ धावा अशी अवस्था झाली. मात्र स्टिव्ह स्मिथने ११९ चेंडूत ६ चौकारांसह ८५ धावांची खेळी केली. त्याने यष्टीरक्षक अॅलेक्स कॅरीसह चौथ्या गड्यासाठी १०३ धावांची भागीदारी केली. कॅरीने ७० चेंडूत ४ चौकारांसह ४६ धावा केल्या.
धावांचा पाठलाग करताना रॉय व जॉनी बेयरस्टॉ यांनी १२४ धावांची सलामी देत इंग्लंडचा विजय स्पष्ट केला. रॉयने ६५ चेंडूत ९ चौकार व ५ षटकारांसह ८५ धावा कुटल्या. बेयरस्टॉने ४३ चेंडूत ५ चौकारांसह ३४ धावा केल्या. बेयरस्टॉ व रॉय बाद झाल्यानंतर जो रुट (४६ चेंडूत नाबाद ४९) आणि कर्णधार इयॉन मॉर्गन (३९ चेंडूत नाबाद ४५) यांनी संघाचा विजय निश्चित केला. (वृत्तसंस्था)ऑस्ट्रेलिया : ४९ षटकांत सर्वबाद २२३ धावा. (स्टीव्ह स्मिथ ८५, अॅलेक्स कॅरी ४६; ख्रिस वोक्स ३/२०, अदिल राशीद ३/५४). पराभूत वि. इंग्लंड : ३२.१ षटकात २ बाद २२६ धावा (जेसन रॉय ८५, जो रुट ४९*, इयॉन मॉर्गन ४५*; पॅट कमिन्स १/३४, मिशेल स्टार्क १/७०.)इंग्लंडने चौथ्यांदा विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली.याआधी १९७९, १९८७ व १९९२ साली इंग्लंडला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.एकाच विश्वचषकात सर्वाधिक २६ बळी घेण्याचा दिग्गज ग्लेन मॅकग्राचा विश्वविक्रम ऑस्ट्रेलियाच्याच मिशेल स्टार्कने २७ बळी घेत मोडला.जो रुटने या सामन्यात एक झेल घेत एकाच विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक १२ झेल घेत ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगला (११) मागे टाकले.