सर्वत्र इंग्रजी नववर्षाचा उत्साह असून, जगभरात २०२४ या नवीन वर्षाचे स्वागत केले जात आहे. नवीन वर्षात नवीन संकल्प करून आगामी काळातील 'लक्ष्य' ठरवले जाते. असेच लक्ष्य भारतीय संघाचा स्टार सलामीवीर शुबमन गिलचे होते, जे त्यानं २०२३ या वर्षात पूर्ण केलं. खरं तर गिलनं मावळत्या वर्षासाठी केलेल्या पाच संकल्पांचा खुलासा केला आहे. त्यानं वर्षाच्या अखेरच्या दिवशी कागदावर लिहलेले पाच संकल्प चाहत्यांच्या माहितीसाठी शेअर केले आहेत. लक्षणीय बाब म्हणजे विश्वचषक वगळता सर्व संकल्प अर्थात लक्ष्य गाठण्यात गिलला यश आल्याचे दिसते.
१९ नोव्हेंबर रोजी भारताला वन डे विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. गिलनं रविवारी सोशल मीडियावर एक पोस्ट करत म्हटले, "बरोबर एक वर्षापूर्वी मी याची एक बकेट लिस्ट बनवली होती. २०२३ या वर्षातील अनुभवांनी खूप काही शिकायला मिळालं. वर्षाचा शेवट मनासारखा झाला नाही. पण, मी अभिमानाने सांगू शकतो की, आम्ही या लक्ष्याच्या खूप जवळ आलो होतो आणि यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले होते. येणारे वर्ष आव्हानांचे असेलच... मला आशा आहे की, आम्ही २०२४ या वर्षात आमचे हे लक्ष्य गाठू.
शुबमन गिलचे पाच संकल्प
- भारताकडून सर्वाधिक शतक झळकावणे.
- कुटुंबीयांना आनंदात ठेवणे.
- आपले सर्वोत्तम देणे.
- विश्वचषक.
- आयपीएल ऑरेंज कॅप.
शुबमन गिल सुसाट
२०२३ हे वर्ष शुबमन गिलसाठी खूप खास राहिले. यंदाच्या वर्षात शुबमन गिलने उत्कृष्ट फलंदाजी केली. आयपीएल २०२३ च्या हंगामात तो सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला. यासह त्याने पहिल्यांदाच ऑरेंज कॅप पटकावली. दरम्यान, २०२३ या वर्षात क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू म्हणून गिलची नोंद झाली आहे. त्याने चालू वर्षात एकूण ४५ आंतरराष्ट्रीय सामने खेळले, ज्यामध्ये ५०.४२च्या सरासरीनुसार २,११८ धावा करण्यात त्याला यश आले. वन डे मध्ये द्विशतक झळकावण्याची किमया देखील गिलने या वर्षात साधली. न्यूझीलंडविरूद्ध १४९ चेंडूत २०८ धावा करून गिल वन डे मध्ये द्विशतक झळकावणारा चौथा भारतीय ठरला.
Web Title: New Year 2024 Indian cricketer Shubman Gill has made five resolutions for the year 2023, the bucket list of which has been shared by him
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.